‘शक्तिमान’ मालिकेतील डॉ. जयकाल फेम अभिनेता ललित परिमू सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. १९९० च्या दशकातील प्रसिद्ध सुपरहिरो मालिका ‘शक्तिमान’मध्ये ललित परिमू यांनी ‘डॉ. जयकाल’ या खलनायकाची भूमिका साकारली होती. आजही ते या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी टीव्ही आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी थेट अक्षय कुमारवर टीका केली आहे. आता त्याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी, असं विधान त्यांनी केलं आहे.

ललित परिमू यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली स्पष्ट मतं मांडली. ‘शक्तिमान’मधील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेव्यतिरिक्त इंडस्ट्रीतील कलाकारांच्या निवृत्तीबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. “बॉलीवूड सेलिब्रिटींनी एका ठराविक काळानंतर निवृत्ती घेतली पाहिजे, असा नियम इंडस्ट्रीत असायला हवा. त्यांना नवीन चित्रपटांच्या ऑफर्स देणं बंद केले पाहिजे. ज्या अभिनेत्यांनी एका मर्यादेपलीकडे भरपूर पैसा कमावला आहे, त्यांनी थांबायला हवं आणि त्यांना काम मिळणं बंद झालं पाहिजे. यासाठी मला एक मोहीम सुरू करायची होती, मी याबद्दल ‘सिंटा’ (CINTAA) मध्येही बोललो होतो,” असं ललित परिमू म्हणाले.

ललित परिमू पुढे म्हणाले, “तुम्ही नवीन लोकांसाठी जागा रिकामी करायला हवी. कॉर्पोरेटमध्ये जसे वयाची पन्नाशी ओलांडल्यावर ५ कोटी रुपये देऊन निवृत्त केलं जातं, तसंच इथेही करायला हवं. कदाचित एखादा २५ वर्षांचा तरुण यापेक्षा खूप चांगलं काम करून दाखवेल.”

थेट अक्षय कुमारचं नाव घेत ललित म्हणाले…

lalit parimoo
ललित परिमू व अक्षय कुमार

ललित पुढे म्हणाले, “आता तुम्ही अक्षय कुमारचंच उदाहरण घ्या, त्याला अजूनही चित्रपटांसाठी ५० कोटी रुपये दिले जात आहेत. अरे, किती पैसा जमा करणार तो? तुम्ही त्याला एवढे पैसे का देत आहात आणि तो तरी का घेत आहे? इंडस्ट्रीत दुसरा कोणताही नवीन अक्षय कुमार का तयार होऊ शकत नाही का? असे १० नवीन अक्षय कुमार तयार होऊ शकतात. एका अभिनेत्याला तुम्ही ५० कोटी रुपये देता आणि दुसऱ्याला फक्त ५० हजार रुपये देता, असा भेदभाव का?”

ललित परिमू यांनी टीव्हीवर ‘डॉ. जयकाल’ या भूमिकेतून त्यांनी मोठी ओळख निर्माण केली, तसेच ‘श्श्श्श्श्… कोई है’ या लोकप्रिय हॉरर मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या. कठोर, मॅच फिक्सिंग, साँग्स ऑफ पॅराडाइज, स्कॅम १९९२, पंचलैट, हैदर, सुनैना, एजंट विनोदसह इतर अनेक चित्रपटांमध्ये ललित परिमू यांनी काम केलं आहे.