‘परेशान’, ‘बलम पिचकारी’ या गाण्यांची तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. ही गाणी मराठमोळ्या शाल्मली खोलगडेने गायली आहेत. तिने वैयक्तिक आयुष्यात २०२१ मध्ये फरहान शेखबरोबर लग्न करत संसार थाटला. शाल्मली हिंदू आहे तर, फरहान मुस्लीम. या आंतरधर्मीय विवाहाला दोन्ही कुटुंबातून संमती होती. पण, सोशल मीडियावर शाल्मलीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याउलट फरहानबद्दल घरी सांगितल्यावर शाल्मलीला तिच्या आईने काही प्रश्न अगदी थेट विचारले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गायिकेने याबाबत खुलासा केला आहे.

शाल्मली ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडले…आम्ही दोघांनी लग्न केलं. माझ्या आई-बाबांचा या नात्याला कधीच विरोध नव्हता. मुलगा कसा आहे हा एवढाच प्रश्न त्यांचा होता. त्यामुळे तुमचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे का? हे सगळ्यात आधी त्यांनी मला विचारलं. आई-बाबांचा दुसरा प्रश्न होता…’तुला भविष्यात मूलबाळ हवंय का?’ माझं उत्तर होतं ‘नाही’! मग, त्यांनी विचारलं, त्याला मूल हवंय का? त्याचंही उत्तर ‘नाही’च होतं. यामध्ये दोघांचं एकमत असणं फार गरजेचं आहे, असं माझ्या आई-बाबांनी सांगितलं. तसंच हा प्रश्न दर काही-काही दिवसांनी एकमेकांना विचारत राहा…जेणेकरून आपल्या जोडीदाराचे विचार आपल्याला समजतात.”

“याशिवाय माझ्या आईने मला विचारलं, तुमच्यातले शरीरसंबंध कसे आहेत? हा प्रश्न ऐकून खरंच मी शॉक झाले होते. कारण, त्याआधी आमच्यात असं संभाषण कधीच झालं नव्हतं. मी आईला म्हटलं सुद्धा अगं सगळं ओके आहे. यावर आई म्हणाली, हा सगळा विचार कर कारण, लग्न यशस्वी होण्यासाठी हेच महत्त्वाचं असतं.” असं शाल्मलीने सांगितलं.

शाल्मली आईबद्दल सांगताना पुढे म्हणाली, “आईजवळ बरेचजण फरहानबद्दल विचारपूस करायला येतात. ‘अगं शाल्मलीचा नवरा…’ आईला बरोबर समजतं की, हे संभाषण आता कोणत्या दिशेने जाणार त्याआधीच ती समोरच्या माणसाला थांबवते आणि म्हणते, शाल्मलीचा नवरा खूप चांगलाय…मी तर शब्दातही सांगू शकत नाही. त्याचं कुटुंबसुद्धा छान आहे…त्याची देखील आई खूपच भारीये. म्हणजे ती फरहानबद्दल इतकं छान बोलते की, समोरचा माणूस पुढे काहीच बोलू शकत नाही. ते सुद्धा मग ‘छान…छान, किती छान!’ असं उत्तर देतात. तिला फरहानचं फार कौतुक आहे…सतत माझा जावई, माझा जावई सुरू असतं.”

दरम्यान, शाल्मली खोलगडेचा नवरा फरहान शेख साउंड इंजिनिअर आहे. शाल्मलीबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘परेशान’, ‘दारू देसी’ आणि ‘बलम पिचकारी’ सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. यासह शाल्मलीने ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ या म्युझिक रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबदारीही पार पाडली आहे.