अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांचा पहिला मुलगा विहान याचे स्वागत केले. पण विकी-कतरिनाने आपल्या मुलाला माध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अजून विहानचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना विहानबद्दलची माहिती फक्त कौशल कुटुंबाकडूनच मिळते. आता विकीचे वडील आणि स्टंट डायरेक्टर श्याम कौशल यांनी विहान नक्की विकीसारखा दिसतो की कतरिनासारखा दिसतो, याचा खुलासा केला आहे.

विहानबद्दल काय म्हणाले श्याम कौशल?

‘इंडिया टुडे’शी बोलताना श्याम कौशल यांनी सांगितलं की, विहान विकीसारखा जास्त दिसतो असं त्यांना वाटतं. “विहानने माझं आयुष्यच बदलून टाकलंय. जेव्हा मी कामात व्यग्र असतो आणि त्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, तेव्हा मी त्याच्याशी दिवसातून दोनदा व्हिडीओ कॉलवर बोलतो. तो खूप छान आहे. मी देवाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत,” असं आपल्या नातवाबद्दल बोलताना श्याम म्हणाले.

मी नशीबवान आहे – श्याम कौशल

श्याम यांनी विकीच्या लहानपणाबद्दलही सांगितलं. विकी लहानपणी अजिबात खोडकर नव्हता, तो खूप समजूतदार होता आणि खून व्यवस्थित वागायचा. श्याम यांनी आपली मुलं व सूनेचं कौतुक केलं. “जगात चांगली मुलं असलेले अनेक आई-वडील आहेत, मीही त्यांच्यापैकीच एक नशीबवान आहे. मी या सगळ्याची कधी कल्पनाही केली नव्हती. मला दोन खूप चांगली मुलं आहेत आणि माझी सूनही खूप छान आहे,” असं श्याम कौशल म्हणाले.

विकी आणि कतरिनाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या मुलाचं स्वागत केलं. त्यानंतर ७ जानेवारी रोजी या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव ‘विहान कौशल’ ठेवलंय, असं जाहीर केलं. दरम्यान, मे महिन्यात कतरिना आणि विकी मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. तिथे विकी फोटो काढण्यासाठी तयार झाला, पण कतरिनाने तिच्या कडेवर बाळ असल्याने फोटोग्राफर्सना तिचे फोटो न काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी स्वतःहून फोटोग्राफर्सना विहानची ओळख करून दिली, पण सोबतच त्यांनी त्यांच्या मुलाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर न टाकण्यास सांगितलं होतं.

आजकाल अनेक बॉलीवूड कलाकार त्यांच्या मुलांच्या प्रायव्हसीची काळजी घेत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या मुलांचे फोटो कधीच शेअर केलेले नाहीत, तसेच फोटोग्राफर्सना ते फोटो काढू देत नाही. तसेच सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनीही मुलांचे चेहरे दाखवले नाहीत.

विकी कौशलचे आगामी चित्रपट

विकी सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचं शूटिंग करतोय. त्याचबरोबर विकी अमर कौशिक दिग्दर्शित ‘महाअवतार’ (Mahavatar) या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.