Shamita Shetty Answers To Trollers : अभिनेत्री शमिता शेट्टीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये वयावरुन ट्रोल करणाऱ्यांचे प्रोफाईल स्क्रीनशॉट शेअर करत सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच या ट्रोलर्सला उत्तर देण्याची ही योग्य संधी असल्याचे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने, आता तुमचे वय झाले आहे आणि तुम्ही आधीसारख्या दिसत नाहीत अशी कमेंट केली होती.
सोशल मीडियावर ट्रोलर्सला उत्तर देत शमिताने लिहिले आहे की, मी आता वेगळी दिसते हे मान्य आहे. वेळेनुसार गोष्टी बदलतात आणि हा निसर्गाचा नियमच आहे. शरीरासह कोणत्याच गोष्टी कायमस्वरूपी टिकून राहत नाहीत. माझ्या वयाप्रमाणे मी सुदृढ आणि आनंदी आहे. देवाने मला जे काही दिले त्यासाठी आभारी आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असे शमिता शेट्टीने लिहिले आहे.
तुम्ही लग्न करुन काय मिळवले – शमिता
शमिता शेट्टीच्या रिलेशनशिपबाबत अनेकदा चर्चा रंगल्या असल्या तरी तिने अद्याप लग्न केलेले नाही. शिल्पा शेट्टी ही शमितापेक्षा ३ वर्षांनी मोठी असून १४ वर्षांच्या मुलांची आई आहे. मात्र, शमिताने लग्न न करता सिंगल आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना शमिताने चोख प्रत्युत्तर दिले. ट्रोलर्सने वेळेत लग्न केले असते तर आज तुमची मुले मोठी असली असती अशी कमेंट केली. यावर शमिताने परखड उत्तर देत लिहिले की, हो, कदाचित माझी मुले मोठी असली असती, पण त्यात काय एवढे? तुम्ही लग्न करून असे काय मिळवले आहे? असा रोखठोक प्रश्न शमिताने विचारला आहे.
मला अनफॉलो करा – शमिता
वयावरून आणि लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीने अनफॉलो करा असेदेखील सुनावले आहे. माझ्यासारखा सिंगल महिलांवर तुमचे पुरुषप्रधान विचार लादण्यासाठी आणि वयावरून टीका करण्यासाठी आम्हाला फॉलो तरी कशाला करता? माझ्यासाठी एक काम करा; मला अनफॉलो करा, अशा शब्दांत अभिनेत्री शमिता शेट्टीने ट्रोलर्सला थेट उत्तर देत सुनावले आहे.

शमिता शेट्टीने गाजवले रिॲलिटी शो
शमिता शेट्टीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहे. शमिता ‘मोहब्बतें’, ‘झहर’, ‘बेवफा आणि कॅश’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकली होती. यानंतर ‘बिग बॉस 15’, ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9’ आणि ‘झलक दिखला जा 8’ सारखे रिॲलिटी शो तिने केले. तसेच शमिता ‘द टेनंट’ या वेब सीरिजमध्ये दिसून आली होती.
