Shamshad Begum Biography : हिंदी चित्रपटसृष्टीत ४० आणि ५०चे दशक हे उत्तम चित्रपटांच्या सुरुवातीचं मानलं जातं. याच काळात सिनेमा हळूहळू विस्तारत होता. नवीन कलाकार येत होते आणि संगीताची व्याख्याही बदलत होती. त्या काळात महिलांनी गायन करणं समाजात चांगलं मानलं जात नव्हतं. मात्र अशाच वेळी एक गायिका समोर आली, जिने सिनेमाची व्याख्या बदलली आणि महिलांसाठी प्रेरणास्थान ठरली.

वडिलांना दिलेल्या एका वचनासाठी त्यांनी अनेक वर्षे स्वतःचा फोटो काढू दिला नाही. त्यांच्या आवाजावर संपूर्ण जग थिरकत होतं, पण त्यांचा चेहरा मात्र कोणीही पाहिला नव्हता. ‘मेरे पिया गए रंगून’पासून ‘कजरा मोहब्बत वाला’सारखी आयकॉनिक गाणी गाऊन प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या या महान गायिकेला आशा भोसले आणि लता मंगेशकर यांसारख्या गायिकाही प्रेरणास्थान मानत होत्या. जाणून घेऊया त्या सुवर्णकाळातील आवाजाबद्दल, ज्यांनी सिनेमाला असंख्य अजरामर गाणी दिली.

कोण होत्या त्या गायिका?

आपल्या आवाजाने इतरांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेचं नाव होतं शमशाद बेगम. ‘जागरन’च्या वृत्तानुसार १४ एप्रिल १९१९ रोजी शमशाद बेगम यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. काही इतिहासकारांच्या मते, त्यांचा जन्म लाहोर येथे झाल्याचा म्हटलं जातं. त्या काळात सिनेमाचा प्रभाव लाहोरपासून कोलकात्यापर्यंत होता. शमशाद बेगम यांचं बालपण गरिबीत गेलं. त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.

शमशाद बेगम यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्या १० वर्षांच्या असल्यापासून गाणी गात होत्या. मात्र त्यांच्या वडिलांना त्यांचं गाणं फारसं आवडत नव्हतं. मुलीने गाणं गाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. पण परिसरातील लोक शमशाद यांच्या आवाजाशी परिचित होते आणि त्यांना त्यांचा आवाज खूप आवडत होता. अशा वेळी शमशाद बेगम यांच्या काकांनी त्यांना मदत केली. शमशाद बेगम यांच्या करिअरमध्ये त्यांच्या काकांनी मोठी भूमिका बजावली. १९३१ साली त्यांनी शमशाद यांना संगीत क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी मदत केली. काकांनी त्यांना गुपचूप ऑडिशनसाठी नेलं होतं.

या ऑडिशनमध्ये शमशाद बेगम उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची निवड ‘जेनोफोन’ म्युझिक कंपनीने केली. यानंतर त्यांच्या गायन प्रवासाला खरी सुरुवात झाली. या ऑडिशनवेळी प्रसिद्ध गायक गुलाम हैदर उपस्थित होते. ते त्या कंपनीचे संगीत दिग्दर्शकही होते. त्यांनी शमशाद बेगम यांच्याबरोबर १५ गाण्यांचा करार केला. तसेच प्रत्येक गाण्यासाठी त्यांना १२ रुपये मानधन देण्याचं ठरलं होतं. यानंतर शमशाद बेगम यांनी अनेक गाणी गायली. त्या काळात त्यांनी गायलेल्या काही गाण्यांचं श्रेय मात्र त्यांना मिळालं नव्हतं, असं म्हटलं जातं.

त्या काळात काही गाण्यांसाठी त्यांचं नाव बदलून सांगितलं जात होतं. यामागचं कारण म्हणजे त्या वेळी लोक आपल्या धर्मातील कलाकारांची गाणी अधिक ऐकण्यास प्राधान्य देत होते. ‘जेनोफोन’ कंपनीबरोबर करार झाल्यानंतर शमशाद बेगम यांनी हळूहळू रेडिओसाठी गाणं सुरू केलं. त्यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’पासून सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने मास्टर गुलाम हैदर इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत संधी दिली.

१५व्या वर्षी केला आंतरधर्मीय विवाह

शमशाद बेगम १३ वर्षांच्या असताना त्या शेजारी राहणारे हिंदू वकील गणपत लाल यांच्या प्रेमात पडल्या. दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. मात्र गणपत लाल हिंदू असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. शमशाद यांनी आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगितल्यानंतर कुटुंबीय नाराज झाले. त्यांनी या लग्नाला परवानगी दिली नाही. प्रेमप्रकरणामुळे मोठा वादही झाला. पण, अखेर शमशाद बेगम यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी, १९३५ साली गणपत लाल यांच्याशी लग्न केलं.

लग्नानंतरही शमशाद बेगम रेडिओवर गाणी गात राहिल्या. त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळाली. १९४१ साली मेहबूब खान यांना शमशाद बेगम यांचा आवाज इतका आवडला की त्यांनी त्यांना मुंबईला बोलावलं. त्यांनी त्यांना बंगला, गाडी आणि इतर सुविधा देण्याची ऑफर दिली. मात्र त्यांच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. पण त्यांच्या पतीची यासाठी संमती होती. अखेर मेहबूब खान यांच्या आग्रहानंतर शमशाद मुंबईत आल्या. त्यानंतर गुलाम हैदर यांनी त्यांना चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिली.

१९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खजांची’ या चित्रपटासाठी शमशाद यांनी आवाज दिला. त्या काळात त्यांचं मानधन कमी होतं, पण त्यांच्या आवाजाचे चित्रपट निर्माते इतके चाहते झाले होते की त्यांना दोन हजार रुपये देण्यासही तयार होते. ४० च्या दशकात शमशाद बेगम मोठ्या स्टार बनत होत्या. त्या काळात इतकी लोकप्रियता मिळालेली त्या एकमेव गायिका होत्या. मात्र लोक फक्त त्यांचा आवाज ऐकत होते, त्यांना प्रत्यक्ष कोणी पाहिलं नव्हतं. ४० आणि ५० च्या दशकातील चित्रपटसंगीतावर त्यांचंच नाव गाजत होतं. त्यापैकी ‘पतंगा’ चित्रपटातील ‘मेरे पिया गए रंगून’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं.

या गाण्याने तरुणांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. त्यानंतर ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘लेके पहला पहला प्यार’, ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ यांसारखी गाणी शमशाद बेगम यांनी आपल्या आवाजाने अजरामर केली. ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या त्या पहिल्या पसंतीच्या गायिका होत्या. ‘आर-पार’ (१९५४) चित्रपटातील ‘कभी आर कभी पार’ आणि ‘बाबूजी धीरे चलना’ या गाण्यांनी त्यांना तरुणांची लाडकी गायिका बनवलं.

पतीच्या निधनानंतर गायनापासून झाल्या दूर

शमशाद बेगम यांनी ४० आणि ५० च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी गायली. मात्र १९५५ साली त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच वर्षी त्यांचे पती गणपत लाल यांचं अपघातात निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर शमशाद बेगम पूर्णपणे खचल्या आणि त्यांनी गायनापासून स्वतःला दूर ठेवलं. अनेकांनी त्यांना पुन्हा गाणं सुरू ठेवण्याचा सल्ला दिला, पण त्या त्या मानसिक अवस्थेत नव्हत्या. याच काळात लता मंगेशकर चित्रपटसृष्टीत पुढे येत होत्या आणि त्यांना नव्या गाण्यांच्या ऑफर्स मिळू लागल्या.

शमशाद बेगम गायनापासून दूर झाल्यानंतर त्याचा फायदा लता मंगेशकर यांना झाला. लता मंगेशकर यांचा आवाज हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू लागला. शमशाद बेगम यांच्या ऐवजी आता गाण्यांच्या ऑफर्स लता मंगेशकर यांना मिळू लागल्या. असंही म्हटलं जातं की, अनेकजण लता मंगेशकर यांना शमशाद बेगम यांच्या शैलीत गाणं गाण्याचा सल्ला देत असत.

मात्र त्या दोन ते तीन वर्षे गायनापासून दूर राहिल्या होत्या. त्यानंतर ‘मदर इंडिया’ चित्रपटासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर त्या गाण्यासाठी तयार झाल्या आणि त्यांनी पुनरागमन केलं. या चित्रपटात त्यांनी ‘पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली’ हे गाणं गायलं. असं म्हटलं जातं की, त्या हे गाणं गात असताना स्टुडिओतील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

लता मंगेशकर यांच्याबरोबरही गायलं गाणं

यानंतर ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील ऐतिहासिक कव्वाली ‘तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे’मध्ये त्यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर गाणं गायलं. ही कव्वाली आजही रसिकांची आवडती मानली जाते. १९६५ पर्यंत त्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गाऊन खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्यांना वाटू लागलं की आता त्यांचा काळ संपत चालला आहे, कारण लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या मोठ्या गायिका इंडस्ट्रीत आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

१९६८ मध्ये ‘किस्मत’ या चित्रपटातील “कजरा मोहब्बत वाला” या गाण्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्या आवाजात अजूनही तिच जादू आहे. हे गाणं आजही खूप लोकप्रिय आहे आणि रिमिक्स स्वरूपातही ऐकलं जातं. यानंतर त्यांनी हळूहळू चित्रपटांसाठी गाणी गाणं कमी केलं. त्यांनी स्वतःहून निवृत्ती घेतली आणि आपला वेळ कुटुंब आणि प्रार्थनेत घालवायला सुरुवात केली. निवृत्तीनंतर त्यांनी आपली मुलगी ऊषाला देखील गाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर त्या आपल्या मुलगी आणि जावयाबरोबर राहू लागल्या.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शमशाद बेगम यांनी अनेक वर्षे आपल्या वडिलांनी घातलेली अट पाळली. त्या कधीही कॅमेऱ्यासमोर आल्या नाहीत आणि नेहमी बुर्का घालत राहिल्या. पण लग्नानंतर हळूहळू त्यांचं वय वाढत गेलं. जेव्हा त्यांच्या काही छायाचित्रे समोर आली, तेव्हा त्या खूप वृद्ध दिसत होत्या. शमशाद बेगम यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत सुमारे ६००० गाणी गायली. २००९ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्म भूषण’ या सन्मानाने गौरवले. तसेच २०१२ मध्ये त्यांना संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ देखील मिळाला. काही वेळा त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्याही पसरल्या होत्या. मात्र, अखेर २३ एप्रिल २०१३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झाले.