टीव्ही आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता शरद केळकरची चाहत्यांमध्ये खास ओळख आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या शरद केळकरने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने नायकांच्या भूमिकांना आवाजही दिला असून, या माध्यमातूनही तो चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

शरद केळकरचा जन्म ७ ऑक्टोबर १९७६ रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्याने ग्वाल्हेरमध्येच मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. त्यानंतर करिअरच्या सुरुवातीला त्याने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. अभिनेत्याने फिजिकल एज्युकेशनमध्येही पदवी घेतली आहे.

अशी मिळाली इंडस्ट्रीत ओळख

शरद केळकरने छोट्या पडद्यावर २००४ मध्ये ‘आक्रोश’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यामध्ये त्याने इन्स्पेक्टर सचिन कुलकर्णीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो ‘उतरन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘सात फेरे: सलोनी का सफर’ आणि ‘सिंदूर तेरे नाम का’ यांसारख्या मालिकांमध्येही दिसला आणि घराघरात लोकप्रिय झाला. २००४ मध्येच शरदने ‘हलचल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’, ‘गोलियों की रासलीला: राम लीला’ आणि ‘लक्ष्मी’ यांसारख्या चित्रपटांमधूनही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याने अनेक मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तो‘राक्षस’, ‘माधुरी’ आणि ‘यंग्राड’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये दिसला आहे.

आवाजानेही जिंकली चाहत्यांची मनं

शरद केळकरने आपल्या अभिनयाबरोबरच आवाजानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. प्रभासच्या ब्लॉकबस्टर ‘बाहुबली’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये प्रभासच्या व्यक्तिरेखेला आवाज देऊन तो विशेष चर्चेत आला होता. ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठीही शरद केळकरने डबिंग केलं आहे. विशेष म्हणजे एबीपीच्या वृत्तानुसार, एकेकाळी त्याला अडखळत बोलण्याची समस्या होती. लहानपणी त्याला या समस्येचा सामना करावा लागला होता. मात्र, पुढे त्याने त्याच्या या समस्येचं ताकदीत रूपांतर केलं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीपर्यंत तो अडखळत बोलायचा.