Sharad Kelkar Says His Voice Causes Loss : शरद केळकर मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयासह तो त्याच्या भारदस्त आवाजासाठीही ओळखला जातो. पण, त्याच्या याच आवाजामुळे त्याला काही वेळा नकार पचवावा लागला आहे. त्यामुळे त्याला काही भूमिका गमवाव्या लागल्याचं त्यानं म्हटलं आहे.

शरद केळकरने आजवर ‘आदिपुरुष’, ‘सलार’, ‘नानी’, ‘बाहूबली’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचं हिंदी डबिंग केलं आहे. त्याच्या आवाजाचं अनेक जण कौतुक करत असतात. पण, त्यामुळे त्याला व्यावसायिक आयुष्यात काही आव्हानांना सामोरं जावं लागलं असल्याचं अभिनेत्यां म्हटलं आहे.

शरद केळकरने व्यक्त केली खंत

‘पीटीआय’शी संवाद साधताना शरद केळकर म्हणाला, “लोकांना असं वाटतं की, माझा आवाज खूप छान आहे आणि माझ्यासाठी तो खूप फायदेशीर आहे; पण खरं तर मला त्याचा तोटा होतो. कारण- अशा काही भूमिका आहेत, ज्यासाठी मला विचारणा होत नाही. जेव्हा मेकर्सला मला सामान्य माणसाच्या भूमिकेसाठी विचारायचं असेल, तर ते संकोचतात. कारण- माझ्या आवाजामुळे तो सामान्य माणसाच्या भूमिकेसाठी सूट होईल का, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो”.

शरद केळकरनं मालिका, चित्रपटांत काम करीत त्याच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यानं ‘राम लीला’, ‘द फॅमिली मॅन’, ‘तान्हाजी – द अनसंग हिरो’, ‘लक्ष्मी’ यांसारख्या चित्रपटांत आणि सीरिजमध्ये सकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, शरद यांना खलनायकाच्या भूमिकाही तितक्याच आवडतात, असं त्यानं आता सांगितलं आहे.

शरद केळकर सध्या ‘तस्करी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्यामध्ये अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. याच सीरिजमध्ये शरद केळकरनं खलनायकाची भूमिका साकारली आहे, जी नुकतीच १४ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये तो स्मगलरच्या भूमिकेत पाहायला मिळतात.

शरद केळकर खलनायकाची भूमिका साकारण्याबद्दल म्हणाला, “तुम्ही कुठल्याही कलाकाराला याबद्दल विचारलंत तर त्यांनासुद्धा खलनायकाची भूमिका साकारायला आवडेल. कारण- त्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात. इतर गोष्टी अनुभवता येतात. ज्या कलाकार म्हणून प्रत्येकाला हव्या असतात. शरद केळकरनं यापू्र्वी ‘भूमी’, ‘१९२०- इव्हिल रिटर्न्स’, ‘ऑपरेशन रोमिओ’ व ‘हाऊसफुल ४’मध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

शरद केळकर पुढे म्हणाला, “एक कलाकार म्हणून मला नायक असो वा खलनायक वेगळ्या भूमिका साकारायला नेहमीच आवडतील. माझी निवड करण्याची पद्धत खूप सोपी आहे. कथा, पात्र आणि कथेतील पात्रांचं महत्त्व याच गोष्टी मी पाहतो.”