The Kerala Story 2 Movie : ‘द केरला स्टोरी २’ सिनेमावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. यामध्ये केरळ, मध्य प्रदेश व राजस्थानमधील तीन तरुणींची कथा दाखवण्यात आली आहे. या तीन मुली धर्मांतराला कशा बळी पडतात ते सिनेमाच्या ट्रेलरमध्येच दाखवण्यात आलं आहे. यामुळे ‘द केरला स्टोरी २’ हा द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. आधी या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळाली होती. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने मेकर्सला दिलासा देत ही स्थगिती हटवली.
सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरला स्टोरी २’ अखेर शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहिल्यावर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, “नमस्कार! मी आताच ‘द केरला स्टोरी २’ हा सिनेमा पाहिला. विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, कामाख्या नारायण सिंह हे ‘द केरला स्टोरी २’ चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अप्रतिम सिनेमा…सुन्न करणारा सिनेमा… जगामध्ये असा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार होतोय. आता या सिनेमाबद्दल कोणीही सेलिब्रिटी, हिंदी सिनेमातील मोठा स्टार बोलणार नाही. पण त्यांनी बोललं पाहिजे, प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला पाहिजे. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवावा. ‘द केरला स्टोरी २’सारखे आणखी सिनेमे बनवले गेले पाहिजेत. चित्रपट हे अतिशय सशक्त आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारं माध्यम आहे.”
“द केरला स्टोरी २’ सिनेमात दाखवलेल्या सगळ्या घटना या वास्तवतेला धरून आहेत. यातील एकही घटना काल्पनिक नाही. जे आजूबाजूला घडतंय किंवा घडलेलं आहे तेच त्यांनी दाखवलंय. हा सिनेमा सर्वांनी पाहायला हवा. आपल्या मुलांना दाखवायला हवा… सुन्न करणारा विचार करायला भाग पाडणारा…अवश्य बघा हा सिनेमा!” असं शरद पोंक्षेंनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.
दरम्यान, कामाख्या सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या पाच दिवसांत या सिनेमाने जवळपास १६.६७ कोटींची कमाई केली आहे.
