शर्मिला टागोर व  मन्सूर अली खान पतौडी हे एकेकाळी लोकप्रिय सेलिब्रिटी कपल होते. त्यांची प्रेमकहाणी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. शर्मिला टगोर व  मन्सूर अली खान पतौडी यांचं आंतरधर्मीय लग्न होतं. त्यामुळे त्यांच्या घरातत सर्व सण साजरे केले जात होते. याबद्दल अनेकदा त्यांनी व त्यांच्या मुलांनी सांगितलं आहे. अशातच आता त्यांची मोठी मुलगी सबा पतौडीने शर्मिला टागोर यांनीच लग्नानंतर इस्लाम स्वीकारून मुलांनाही इस्लाम धर्माची ओळख करुन दिल्याचं सांगत ती धार्मिक आहे असं म्हटलं आहे.

शर्मिला टागोर आणि  मन्सूर अली खान पतौडी यांची लेक सबा पतौडीचं बालपण राजघराण्यात गेलं. मन्सूर यांच्याशी लग्न केल्यानंतर शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. नुकतंच सबाने सांगितलं की, तिच्या आईनेच त्यांना इस्लाम धर्माची ओळख करून दिली आणि त्यांची जडणघडण त्यानुसार झाली. सबाने पुढे हेही स्पष्ट केलं की, त्यांनी कधीही हिंदू धर्माचं आचरण केलं नाही आणि त्यांच्या कुटुंबाचं कधी मंदिरातही जाणं झालं नाही.

माझा धर्म इस्लाम आहे आणि मी आध्यात्मिक आहे – सबा पतौडी

‘बिग बॉलीवूड बफ्स’ला दिलेल्या मुलाखतीत सबाने सांगितलं की, त्यांचा इस्लाम धर्माशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. स्वतःला धार्मिक व्यक्ती म्हणत ती म्हणाली, “माझ्यासाठी माझा धर्म इस्लाम आहे आणि माझं त्याच्याशी नातं आहे. मी आध्यात्मिकही आहे, कारण जर मला देवाचा विचार करायचा झाला, तर मी कदाचित अल्लाह म्हणेन. याचा अर्थ असा अजिबात नाही की मी इतर धर्मांचा आदर करत नाही”.

आम्ही मंदिरात जात नव्हतो आणि हिंदू धर्माचं आचरणही करत नव्हतो – सबा पतौडी

सबाने सांगितलं की, मन्सूर पतौडीबरोबर लग्न केल्यानंतर त्यांच्या आई शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि मुलांनाही या धर्माची ओळख करून दिली. मुलं गोंधळून जाऊ नये आणि त्यांच्या आयुष्याला एक आधार मिळावा, या उद्देशाने शर्मिला यांनी त्यांना इस्लाम धर्म, रमजान आणि त्यातील श्रद्धा-परंपरांबद्दल समजावून सांगितलं. मात्र, पुढे त्यांनी कोणता धर्म स्वीकारायचा हा निर्णय मुलांवरच सोपवला. सबा म्हणाली, “अम्मा आणि अब्बांचं लग्न झाल्यानंतर अम्माने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आम्हालाही इस्लाम धर्माची शिकवण दिली. कदाचित आम्ही गोंधळून जाऊ नये आणि आम्हाला एक आधार मिळावा, हा त्यामागचा उद्देश असावा. त्यामुळे आम्ही मंदिरात जात नव्हतो आणि हिंदू धर्माचं आचरणही करत नव्हतो. खरं तर, तिनेच मला माझ्या धर्माची आणि इस्लाम, रमजान यांसारख्या गोष्टींची ओळख करून दिली. त्यानंतर पुढे कोणत्या धर्माचं आचरण करायचं, हा निर्णय आमच्यावर सोपवण्यात आला.”

सबाने स्पष्ट केलं की, त्यांच्या आई-वडिलांनी तिन्ही भावंडांवर कोणत्याही एकाच धर्माचं पालन करायचं असा निर्णय लादला नव्हता. ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी किंवा आईने किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीने आमच्यापैकी कोणावरही कोणत्या एका धर्माचं पालन करायचा हा निर्णय लादला नाही.” आपल्या भावंडांबद्दल बोलताना, अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा संदर्भ देत सबाने सांगितलं की, दोघांनीही वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींशी लग्न केलं आहे. ती म्हणाली, “माझ्या भावंडांनी आंतरधर्मीय लग्न केलं आहे. मला वाटत नाही की त्यांच्यापैकी कोणीही कोणत्याही गोष्टीचं अगदी काटेकोरपणे पालन करतं. पण माझ्या मते श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. ती कोणावरही लादता येत नाही. तुम्ही कोणत्या गोष्टीकडे वळायचं, हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे.”

सबाने वेगवेगळ्या धर्मांतील सण साजरे करणाऱ्या कुटुंबात आपलं बालपण गेल्याची आठवणही सांगितली. ती म्हणाली, “आम्ही ख्रिसमस, दिवाळी, होळी असे सर्व सण साजरे करत मोठे झालो. माझ्या आई-वडिलांनी कधीही आमच्यावर कोणताही विशिष्ट धर्म लादला नाही आणि माझ्या मते, ते योग्यच आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांबरोबर असंच करायला हवं.” सिमी गरेवालला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांना धर्म बदलण्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्या म्हणालेल्या, “हे सोपही नव्हतं आणि फार कठीणही नव्हतं. या गोष्टीचा सामना करून ती समजून घेणं गरजेचं होतं. तुम्ही याबाबत फार हलगर्जीपणे वागू शकत नाही. त्याआधी मी फार धार्मिक नव्हते. पण आता मला हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांबद्दल अधिक माहिती आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की, ‘आयशा हे नाव त्यांच्या पतीनेच त्यांना सुचवलं होतं.

‘ट्वीक इंडिया’सह संवाद साधताना शर्मिला टागोर यांनी लग्नाची घोषणा केल्यानंतर त्यांना धमक्या मिळाल्याचाही खुलासा केला होता. “गोळ्या बोलतील,” अशी धमकीही आपल्याला देण्यात आली होती, असं म्हटलं होतं.