Sharmila Tagore Interview: बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या लोकप्रियतेसह त्यांच्या वेळ पाळण्याच्या सवयींच्याही चर्चा रंगत असतात. काही कलाकार वेळेआधी सेटवर पोहोचतात, तर काहींच्या उशिरामुळे संपूर्ण युनिटला तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अशाच एका अनुभवाचा खुलासा ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी केला आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शम्मी कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या दिग्गज कलाकारांसह काम केलेल्या शर्मिला यांनी शूटिंगदरम्यान घडलेल्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी काही सुपरस्टार्सच्या कायम उशिरा सेटवर येण्याच्या सवयीचा उल्लेख करत शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत आठवणी सांगितल्या आहेत.
शर्मिला टागोर यांनी ‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेविश्वातील आठवणींना उजाळा दिला असून त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. त्यांनी काही अभिनेते हे प्रचंड उशिरा सेटवर येत असल्यामुळे शूटिंगचा वेळ वाया जात असल्याची खंत व्यक्त केली. काही सहकलाकारांमध्ये वेळेचं भान असणं हा गुण अतिशय दुर्मीळ होता, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे. शर्मिला टागोर म्हणाल्या, “आम्ही सकाळी ९:३० वाजता मेकअप आणि लूक करून तयार असायचो आणि काहीजण साधारण ११ वाजता यायचे. शत्रुघ्न सिन्हा तर त्यांना वाटेल तेव्हा यायचे.”
यामुळे राज खोसलांचे केस गळून गेले – शर्मिला
शर्मिला टागोर यांनी अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत शिस्तप्रिय स्वभावाचे कौतुक करत ते कधीही उशीर करत नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “राज खोसला हे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना दिग्दर्शित करत होते. त्यावेळी अमिताभ हे अगदी वेळेवर यायचे. जर शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी २ ची असेल, तर ते ७ वाजता तिथे हजर असायचे. जर ती दुपारी २ ते रात्री १० ची असेल, तर ते २ वाजता तिथे असायचे. याउलट, ‘शत्रू’ (शत्रुघ्न सिन्हा) मात्र त्यांना वाटेल त्या वेळी यायचे. ज्या वेळी शत्रूंची गाडी तिथे पोहोचायची, त्याच वेळी अमिताभ यांची गाडी तिथून निघायची. बिचाऱ्या राज खोसलांचे तर यामुळे केसच गळून गेले होते.”
कलाकरांच्या या उशिरा येण्याच्या सवयीबाबत त्यांना कधी जाब विचारला का, असा प्रश्न शर्मिला यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. त्या बिचाऱ्यांची जडणघडणच तशी झाली होती.
शर्मिला टागोर यांचा आंतरधर्मीय विवाह
शर्मिला टागोर यांचे रिलेशनशीपही चर्चेचा विषय ठरले होते. त्यांची आणि दिवंगत क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी म्हणजेच टायगर पटौदी यांची प्रेमकहाणी नेहमी चर्चेत असते. त्या काळी या आंतरधर्मीय विवाहाला समाजातून प्रचंड विरोध झाला होता. लग्नापूर्वी ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात होते, असा खुलासा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर या आंतरधर्मीय लग्नामुळे त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शर्मिला आणि टायगर यांनी १९६८ मध्ये लग्न केलं होतं.
