Sharmila Tagore on Mansoor Ali Khan Pataudi Marriage: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी म्हणजेच टायगर पटौदी यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत असते. मात्र, त्या काळी या आंतरधर्मीय विवाहाला समाजातून प्रचंड विरोध झाला होता. लग्नापूर्वी ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असा खुलासा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर या आंतरधर्मीय लग्नामुळे त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या.

“आम्ही लग्नाआधी एकत्र राहत होतो, कारण ते आमच्यासाठी अधिक सोयीचं होतं. मला घर सांभाळता यायचं नाही, त्यामुळे टायगर अनेकदा आंघोळीसाठी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’मध्ये जायचे. कारण माझ्या घरी कोणतीच गोष्ट नीट नसायची. त्या काळी मला नीट घर सांभाळता यायचं नाही, पण इतक्या वर्षांमध्ये हळूहळू मी सगळ्या गोष्टी शिकले आहे. आता मला माझ्या घराचा खूप अभिमान वाटतो,” असं शर्मिला टागोर हसत म्हणाल्या.

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शर्मिला आणि टायगर यांनी १९६८ मध्ये लग्न केलं. त्यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक होती. टायगर यांनी शर्मिला यांना कॉफीसाठी विचारण्यापूर्वी त्यांच्याशी एक प्रँक केला होता. लंडनहून मागवलेले पाच एसी पाठवत असल्याची गंमत त्यांनी केली होती. अशा रितीने एकदा भेटल्यावर ते परत भेटतच राहिले आणि प्रेमात पडले.

लग्नाआधी मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्या

आंतरधर्मीय लग्न करणं त्याकाळी सामान्य नव्हतं. अशी लग्नं समाजाच्या चौकटीबाहेरची समजली जायची. त्यामुळे त्यांच्या लग्नावर लोकांच्या आणि मीडियाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. शर्मिला यांच्या मते, दोघेही आपापल्या करिअरमध्ये खूप व्यग्र असल्यामुळे त्यांच्यावर याचा फारसा परिणाम झाला नाही, पण त्यांच्या कुटुंबियांना मात्र या दबावाचा प्रचंड सामना करावा लागला.

Sharmila Tagore Mansoor Ali Khan Pataudi Marriage
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पटौदी यांच्या आंतरधर्मीय लग्नाला झाला होता तीव्र विरोध

त्या म्हणाल्या, “आम्हाला ते फारसं जाणवलं नाही, कारण मी कामात व्यग्र होते आणि टायगर क्रिकेट खेळत होते. पण माझे आई-वडील आणि टायगरच्या आईवर खूप दबाव होता, कारण बाहेर बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या. मीडियाने म्हटलं होतं की आमचं लग्न १५ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, हे लग्न अपयशी ठरेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.”

दिवंगत यश चोप्रा यांनीही त्यांना राजघराण्यात लग्न करण्याबाबत सावध केलं होतं, असा खुलासाही त्यांनी केला. “यश चोप्रा मला म्हणाले होते, ‘हे नवाब खूप संशयी स्वभावाचे असतात, त्यामुळे तुला खूप काळजीपूर्वक राहावं लागेल.’ ते माझे खूप चांगले मित्र होते आणि त्यांना माझी मनापासून काळजी वाटत होती.”

लग्नाला विरोध आणि धमक्या

शर्मिला म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांना पत्र पाठवून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यावर ‘आता गोळ्याच बोलतील’ असं लिहिलेलं होतं. सुरक्षेच्या कारणांनी माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न ‘फोर्ट विलियम’ या सुरक्षित ठिकाणी करायचं ठरवलं. पण तिथे पाहुण्यांच्या यादीवरून काहीतरी अडचण आली आणि ऐनवेळी तिथली परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्हाला घाईघाईत एका राजदूताच्या घरी लग्न करावं लागलं.”

शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पटौदी लग्नानंतर ४३ वर्षे एकत्र राहिले. २०११ टायगर पटौदी यांचे निधन झाले. त्यांना सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान ही तीन अपत्ये आहेत. सुरुवातीला आंतरधर्मीय विवाहामुळे हे लग्न फार काळ टिकणार नाही असं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही.