अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत दमदार भूमिका साकारल्या. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलीवूडमध्ये वेगळ स्थान निर्माण केलं. आपल्या कारकिर्दित त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९६८ साली शर्मिला यांनी दिवंगत भारतीय क्रिकेटर मंसूर अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करण्याच्या निर्णयानंतर शर्मिला यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत शर्मिला यांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.




शर्मिला यांनी नुकतंच ट्विक इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांच्या लग्नात आलेल्या समस्यांवर भाष्य केलं. शर्मिला आणि मंसूर अली खान यांचा आंतरधर्मीय विवाह आहे. शर्मिला हिंदू होत्या तर मंसूर अली खान मुस्लीम. शर्मिला यांना मंसूर अली खान यांच्याशी लग्न केलं तर त्यांच्या कुटुंबाला गोळी मारली जाईल अशी धमकीही मिळाली होती.
शर्मिला म्हणाल्या, “माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण, माझे काका, माझे चुलत भाऊ या सर्वांचे लग्न बंगाली लोकांशी झाले होते आणि टायगरच्या कुटुंबातील सर्वांनी आपापल्या समाजात लग्न केले होते. टायगर आणि मी एकटेच होतो आणि आम्ही आपापल्या घरच्यांना जाहीर केले होते की आम्ही लग्न करणार आहोत, त्यावेळी मी चित्रपटांमध्ये काम करत होते आणि ते क्रिकेट खेळत होते. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आम्हाला माहिती नव्हते.”
शर्मिला पुढे म्हणाल्या, “सुरुवातीला आम्ही कोलकात्याच्या फोर्ट विल्यममध्ये लग्नाची व्यवस्था केली होती. त्यांच्या आंतरजातीय विवाहाशी संबंधित संभाव्य धोके आणि इतर गोष्टींमुळे हा पर्याय निवडला होता. मात्र, टायगर यांच्या कुटुंबातील काहींची लष्करी अधिकाऱ्यांशी ओळख होती, त्यामुळे शेवटच्या क्षणी आम्ही फोर्ट विल्यम स्थळ रद्द केले आणि एका राजदूत अधिकारी असणाऱ्या मित्राच्या घरी आम्ही लग्न केलं.”