हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नेते धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना देशी मातीतला ही मॅन असं बिरुद मिळालं होतं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टी शोकाकुल झाली. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र या दोघांनी चुपके चुपके या चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी आज धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या.

शर्मिला टागोर काय म्हणाल्या?

८ डिसेंबरला माझाही वाढदिवस असतो आणि धर्मेंद्र यांचाही वाढदिवस असतो. मी या वर्षी माझा वाढदिवस साजरा करु शकणार नाही. धर्मेंद्र हे माणूस म्हणून खूप गोड स्वभावाचे आणि मोठ्या मनाचे होते. त्यांच्या बरोबर शुटिंगमध्ये घालवलेले अनेक क्षण आहेत. मी त्यांच्यासह आऊट डोअर शुटिंगलाही गेले आहे. गर्दी असेल तरीही भीती वाटायची नाही कारण आम्हाला माहीत असे की धरमजी आहेत. सत्यकाम च्या शुटिंगच्या वेळी आम्ही रात्री शुटिंग करत होतो. त्यावेळी बरीच गर्दी झाली होती. धर्मेंद्र यांनी मला त्यावेळी त्या गर्दीतून बाहेर काढलं. धर्मेंद्र यांच्यासह शूट असेल तर अगदीच सेफ वाटायचं. आम्ही ज्या काळात काम करायचो तो काळ सुरक्षा रक्षक वगैरे फार नसत. मग त्या काळात आम्हाला सुरक्षेच्या बाबतीत मला आणि माझ्यासह अनेक अभिनेत्रींना धर्मेंद्र बरोबर असतील तर सेफ वाटत असे. धर्मेंद्र हे पुष्कळ गप्पा मारायचे. अनुपमाच्या शुटिंगलाही गर्दी झाली होती तेव्हा मी तिथून धर्मेंद्र यांच्यासह सहिसलामत बाहेर पडू शकले.

माझी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट अनुपमाच्या सेटवर झाली होती-शर्मिला टागोर

अनुपमाच्या सेटवर माझी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली होती. धर्मेंद्र हे खूप काळजी घेणारे होते. धर्मेंद्र हे त्या काळातले स्टार होते पण ते कधीही तसा काही अहंकार बाळगून वागले नाहीत. त्यांचं वागणं चारचौघांसारखंच असे. ते मोकळेपणाने गप्पा मारत, जे बोलत ते अगदी मनापासून असायचं. त्यांच्या कितीतरी आठवणी आज मला येत आहेत असं शर्मिला टागोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

Award Banner

धर्मेंद्र म्हणजे ग्रेट स्वभावाचा माणूस-शर्मिला टागोर

धर्मेंद्र हे त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे, त्याचप्रमाणे त्यांच्याशी मैत्री केलेल्या प्रत्येकाची ते काळजी घ्यायचे. त्यांच्यासारखा ग्रेट स्वभावाचा माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यांनी आजवर अनेकांना मदत केली आहे. सध्याच्या घडीला लोक फक्त स्वतःपुरता विचार करतात पण धर्मेंद्र तसे मुळीच नव्हते ते कायमच सगळ्यांचा विचार करायचे. त्यामुळे लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत असत. मागच्या काही काळापासून आम्ही फोनवरही बोलायचो. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत बिघडली होती. मला वाटलं की ते बरे होतील. ८ डिसेंबरला ते ९० वर्षांचे झाले असते आणि मी ८१ वर्षांची. पण आता मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही असंही शर्मिला टागोर यांनी म्हटलं आहे.