Sharvari Wagh’s New Movie Main Wapas Aaunga Teaser Release : बॉलीवूडमध्ये येत्या काळात अनेक लोकप्रिय कलाकारांचे नवीन चित्रपट प्ररदर्शित होणार आहेत. अशातच आता या यादीत अजून एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. बॉलीवूड चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकणाऱ्या मराठमोळ्या शर्वरी वाघच्या चित्रपटाचा यामध्ये समावेश आहे.
२०२६ मध्ये हिंदी प्रेक्षकांना विविध विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहेत, तर अनेक बडे कलाकार यातून त्यांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता शर्वरी वाघच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. शर्वरीचा हा चित्रपट कसा आहे आणि कधी प्रदर्शित होणार आहे, तसंच यामध्ये तिच्याबरोबर कोणते कलाकार झळकणार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘मुंज्या’ या मराठमोळी कथा असलेल्या हिंदी चित्रपटातून शर्वरी वाघला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानसह ‘माहराज’ या चित्रपटात झळकली. यामध्ये तिने साकारलेल्या विराज या गुजराती व्यक्तिरेखेसाठी तिचं अनेकांनी कौतुक केलेलं. गुजराती भाषेचा लहेजा, लूक सर्वच शर्वरीने उत्तमरित्या हाताळलेलं. त्यानंतर अभिनेत्री ‘वेदा’ या चित्रपटातून झळकली. अशातच आता इम्तियाज अली दिग्दर्शित मैं वापस आउंगा’ या चित्रपटातून ती झळकणार आहे.
शर्वरी वाघसह इम्तियाज अली यांच्या या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ व बॉलीवूड अभिनेता वेदांग रैना महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. शर्वरी यामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. पंजाबमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं असून तिकडची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकतंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि टीझर समोर आला आहे. यामधून ही प्रेमकथा असल्याचं समजतं. शर्वरी यामध्ये एका तरुण मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. दोन वेण्या, पंजाबी ड्रेस असा तिचा लूक आहे. तर वेदांग टीझरमध्ये ‘मैं वापस आउंगा’ असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल उत्सुक्ता निर्माण झाली आहे.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचं संगीत ए. आर. रहमान यांनी केलं आहे, तर या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहसुद्धा झळकणार आहेत. ‘मैं वापस आउंगा हा चित्रपट १२ जून २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचं पंजाब येथे शूटिंग सुरू होतं. शर्वरी वाघ सोशल मीडियावरून चित्रपटातील शूटिंगचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत होती. अशातच आता अखेर तिच्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून तारीखही जाहीर झाली असल्याने ती लवकरच मोठ्या पडद्यावर एका नवीन भूमिकेतून झळकणार आहे.
