Maharaj Completes One Year : अभिनेत्री शर्वरी वाघ २०२४ रोजी आलेल्या ‘महाराज’ या चित्रपटातून झळकली होती. त्यामध्ये तिच्यासह आमिर खानचा मुलगा जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकला होता. शर्वरी व जुनैद यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्यातील संवाद, चित्रपटातील गाणी या सगळ्या गोष्टींमुळे दोघांमधील केमिस्ट्री फुलून आली. या चित्रपटातून पहिल्यांदाच जुनैद व शर्वरीने एकत्र काम केलं होतं.

आदित्य चोप्रा निर्मित ‘महाराज’ हा चित्रपट २१ जून २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पूर्ण एक वर्ष झंले आहे. त्यानिमित्त चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करीत शर्वरीने चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त करत म्हटले आहे, “हाँ के हाँ, हा चित्रपटातील एक संवाद माझ्यासाठी एक भावना झाली आहे. माझ्या विराज या भूमिकेला तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं, ते माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपटातील गाण्यांवर रील बनवण्यापासून ते विराजसारखा लूक, संवाद या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत”.

शर्वरीने तिच्या पोस्टद्वारे चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा, वैभवी मर्चंट, जयदीप अहलावत, जुनैद खान या सर्व कलाकारांचेही आभार मानले आहेत. मराठमोळ्या शर्वरीने ‘महाराज’ चित्रपटात विराज हे गुजराती मुलीचं पात्र चोखरीत्या साकारलं होतं. त्यामध्ये ती गुजराती पद्धतीच्या साड्या अन् लूकमधून दिसली आणि संवादाद्वारे व्यक्त झाली. त्यासाठी तिचं प्रेक्षकांकडून कौतुकही झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्वरीने ‘बंटी और बबली २’, ‘मुंज्या’, ‘महाराज’, ‘वेदा’ या चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामधील ‘मुंज्या’ व ‘महाराज’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटांनंतर शर्वरी लवकरच लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टसह तिच्या ‘अल्फा’ या आगामी चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहे.