Shashi Tharoor Praises Priyanka Chopra : अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ‘हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा या दोघांनाही मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
शशी थरूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची ही भेट जवळपास १० वर्षांनी झाली. त्यामुळे या भेटीचे काही खास फोटो शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
भेटीचे फोटो शेअर करत शशी थरूर यांनी लिहिले, “जवळपास एक दशकानंतर प्रियांका चोप्राची हार्वर्डमध्ये बॅकस्टेजला भेट झाली. ती हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये समारोपाचे भाषण देणार होती, त्याआधी आम्ही एकमेकांना भेटलो. ती आज जे काम करत आहे, ते पाहून खूप आनंद झाला. ज्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीयांना क्वचितच संधी मिळते, त्या मंचावर तिने यश मिळवून भारताचा अभिमान वाढवला आहे.”
शशी थरूर यांच्या या पोस्टला उत्तर देताना प्रियांकाने लिहिले “तुम्हाला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचे मी नेहमीच कौतुक केले आहे. लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा आहे.”
या परिषदेत प्रियांकाने आपल्या करिअरमधील प्रवास आणि आलेल्या आव्हानांबद्दलही सांगितलं. शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्याने तिच्या आयुष्यावर मोठा प्रभाव झाला, असे ती म्हणाली. तिच्या या भाषणाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, प्रियांका चोप्राच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रियांका लवकरच अॅक्शन थ्रिलर ‘द ब्लफ’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
तसेच, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘वाराणसी’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

