Shatrughan Sinha Reena Roy Affair: शत्रुघ्न सिन्हा हे ७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक होते. त्या काळातील अनेक मोठ्या अभिनेत्यांप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले होते. शत्रुघ्न अभिनेत्री रीना रॉयच्या प्रेमात होते, पण तरीही १९८० मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनमशी लग्न केलं, त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयशी नातं संपवू शकले नव्हते. रीना या आशेवर होती की शत्रुघ्न तिच्याशी कधीतरी नक्की लग्न करतील.
शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘एनीथिंग बट खामोश’ (Anything But Khamosh) या आत्मचरित्रात आयुष्यातील कठीण काळाचा उल्लेख केला. पूनमशी लग्न केलं, त्यानंतरचा काळ भावनात्मकदृष्ट्या खूप कठीण होता. कारण त्यांना या सर्वातून बाहेर पडण्यास वेळ लागत होता. या काळात त्यांची पत्नी पूनम खूप रडायची.
लग्नानंतरही भेटायचे शत्रुघ्न-रीना
शत्रुघ्न म्हणाले, “ही परिस्थिती गुंतागुंतीची होती कारण त्यात दुसऱ्या व्यक्तीला (रीना) मी वचन दिले होते.” लग्नानंतरही शत्रुघ्न रीनाला भेटायचे, तेव्हा ती असे प्रश्न विचारायची ज्यांचे उत्तर देणं शत्रुघ्न यांना कठीण जायचं. “तू तर लग्न करून आयुष्यात सेटल झालास, मग मी तुझ्यासाठी फक्त एक खेळणी होते का, की वापरून फेकून दिलंस?” असं रीना रॉय विचारायची.
विवाहबाह्य संबंधांबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले…
शत्रुघ्न म्हणाले, “मी प्रत्येक पुरूषाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की विवाहबाह्य संबंधात असल्याने नेहमीच तुमच्या मनात अपराधीपणाची भावना असते. जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या स्त्रीबद्दल स्वतःला दोषी समजता आणि जेव्हा तुम्ही तिच्याबरोबर असता तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल स्वतःला दोषी समजता.”

भावाने शत्रुघ्न यांना रीना रॉयशी लग्न करण्यास सांगितलं होतं
या काळात शत्रुघ्न आणि रीना एकत्र काम करत राहिले. १९८३ मध्ये पूनम आठ महिन्यांची गर्भवती असताना शत्रुघ्न सिन्हांचे मोठे भाऊ राम सिन्हा यांनी त्यांना रीनाशी लग्न करण्यास सांगितलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिलंय की राम यांनी त्यांना रीनाच्या घरी बोलावलं आणि म्हणाले, “इथे आणि आत्ताच, तुला रीनाशी लग्न करावं लागेल.”
राम सिन्हा यांनी लिहिलेलं पत्र
हे ऐकून शत्रुघ्न सिन्हांना धक्का बसला. राम सिन्हांच्या मते, शत्रुघ्न यांनी रीनाला लग्नाचं वचन दिलं होतं. त्यामुळे जर ऐकलं नाही तर दोघांचंही अफेअर कुटुंबीय व माध्यमांसमोर उघड करण्याची धमकी राम यांनी शत्रुघ्न सिन्हांना दिली होती. राम सिन्हा यांनी शत्रुघ्न आणि रीनाच्या नात्याबद्दल सविस्तर पत्रही लिहिलं होतं. हे पत्र सिन्हा कुटुंब आणि शत्रुघ्नच्या जवळच्या लोकांना पाठवण्यात येणार होतं. पत्राच्या शेवटी त्यांनी “…आणि म्हणूनच त्याने रीनाशी लग्न करायला पाहिजे,” असं लिहिलं होतं. या पत्राबद्दल शत्रुघ्न सिन्हांचे सेक्रेटरी पवन कुमार यांना समजलं. मग त्यांनी ही परिस्थिती हाताळली. शत्रुघ्न सिन्हांना सर्व कळवलं. पवनमुळे शत्रुघ्न आणि पूनम यांचं लग्न टिकलं.
शत्रुघ्न सिन्हा यांनी भावाचं म्हणणं ऐकलं नाही आणि रीनाशी लग्न करण्यास नकार दिला. मग रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव सनम खान आहे. शत्रुघ्न सिन्हा पत्नी पूनमबरोबरच राहिले. त्यांना १९८३ मध्ये लव व कुश ही जुळी मुलं झाली आणि १९८७ मध्ये मुलगी सोनाक्षी झाली.
