शत्रुघ्न सिन्हा यांचं वैयक्तिक आयुष्य अगदी चित्रपटाच्या कथेसारखं होतं. कारण ते एका ट्रेन प्रवासात पूनमच्या प्रेमात पडले. पूनमबरोबर नात्यात असताना ते रीना रॉयलाही डेट करत होते. रीनासाठी त्यांनी पूनमबरोबरचं नातं संपवलं. पण पूनम आयुष्यात परतली आणि शत्रुघ्न यांनी तिच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतरही ते रीनाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी स्वतः याबद्दल कबुली दिली होती.
शत्रुघ्न सिन्हा व पूनम यांची पहिली भेट १९६५ साली ट्रेनमध्ये झाली होती. त्यावेळी पूनम शाळेत शिकत होती. पूनम इतकी सुंदर होती की शत्रुघ्न यांना ती पहिल्या नजरेतच आवडली होती. भारती एस प्रधान यांनी लिहिलेल्या ‘एनीथिंग बट खामोश’ या आत्मचरित्रात सिन्हा यांनी म्हटलं होतं की पूनम खूप लहान आहे, हे माहीत असूनही तिला स्पर्श करणे, मिठी मारणे, तिला जवळ घेणे, यांसारख्या रोमँटिक कल्पना त्यांच्या मनात येत असत. एकदा त्यांचा पाय तिच्या पायाला लागला आणि त्यामुळे अंगावर शहारे आले होते, असंही त्यांनी म्हटलं होतं.
पूनम व शत्रुघ्न यांनी एकत्र केलं काम
ट्रेनचा प्रवास दोन दिवसांचा होता. त्यावेळी पूनमबरोबर तिची मावशी होती. शत्रुघ्न यांनी मावशीकडून तिचा पत्ता घेतला. काही वर्षांनंतर, १९६८ मध्ये पूनमने ‘मिस यंग इंडिया’ नावाची सौंदर्य स्पर्धा जिंकली, तेव्हा शत्रुघ्नला त्यांच्या त्या अचानक झालेल्या भेटीची आठवण झाली. त्याकाळी सौंदर्य स्पर्धेच्या विजेतीला चित्रपटांच्या ऑफर्स मिळायच्या. एक विचित्र योगायोग असा की शत्रुघ्न यांच्या आधी पूनमला अभिनेत्री व्हायची संधी मिळाली. शत्रुघ्न यांना पूनम आवडत होती, पण तेवढं रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी पुरेसं नव्हतं. दोघांनी १९७१ साली ‘धरती की गोद में’ या चित्रपटात एकत्र काम केलं. मग त्यांच्यात जवळीक वाढली.
शत्रुघ्न जसजसचे करिअरमध्ये पुढे जाऊ लागले, तसतसं त्यांना महिलांचं अटेंशन मिळू लागलं. ते त्यांना नाही म्हणू शकले नाही. पूनमच्या मावशीला याची कल्पना होती. शत्रुघ्न यांचे अफेयर होते. काही काळाने त्यांनी पूनमबरोबर ब्रेकअप केलं. ती आपल्यासाठी खूप चांगली आहे, असं त्यांना वाटत होतं. यानंतर पूनमने फिल्म इंडस्ट्री सोडली.
शत्रुघ्न यांनी पूनमबरोबर केलं ब्रेकअप
“मी तिला सांगितलं की, तू माझ्यासाठी खूप चांगली आहेस, त्यामुळे तू आणखी चांगला जोडीदार डिझर्व्ह करते. मला एकटं सोडं, असं मी तिला म्हटलं. ती प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होती. ती जे काही करायची, ते मला खूश करण्यासाठीच असायचं. तिने आपलं संपूर्ण आयुष्य माझ्या सोयीनुसार बदलून घेतलं होतं. अशा प्रकारच्या समर्पणावर माझा विश्वासच बसत नव्हता,” असं शत्रुघ्न सिन्हांनी त्याच पुस्तकात सांगितलं. शत्रुघ्न व पूनम तीन वर्षे वेगळे झाले.
शत्रुघ्न यांनी पूनमबरोबर ब्रेकअप केलं. त्यावेळी ते रीना रॉयबरोबर नात्यात होते. यामुळे पूनमला खूप वाईट वाटलं. शत्रुघ्न आणि रीना हे त्या काळातील अमिताभ बच्चन-रेखा, धर्मेंद्र-हेमा मालिनी यांच्यासारखे होते. त्यांच्या नात्याबद्दल सगळीकडे चर्चा होती.

रीना रॉय व शत्रुघ्न सिन्हांचं अफेयर
रीना व शत्रुघ्न यांच्यातील जवळीक वाढत असताना पूनम त्यांच्या आयुष्यात परत आली. दोघीही शत्रुघ्न यांना लग्नासाठी विचारत होत्या. “कोणाशी लग्न करायचं ही माझी समस्या नव्हती, तर कोणाशी लग्न करायचं नाही ही होती,” असं शत्रुघ्न म्हणाले होते. एकाच वेळी ते दोन्ही नात्यात स्थिर होते. पण आईच्या हस्तक्षेपानंतर, शत्रुघ्न यांनी पूनमशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रीनाला नकार कळवला. पण तरीही रीनाबरोबरचं नातं त्यांनी संपवलं नाही.
लग्नाच्या दोन दिवसाआधी गर्लफ्रेंडबरोबर होते शत्रुघ्न सिन्हा
पूनमशी लग्न करण्याच्या दोन दिवसाआधी, शत्रुघ्न एका स्टेज शोसाठी रीनाबरोबर लंडनमध्ये होते. शत्रुघ्न यांना विमानतळापर्यंत सोडायला रीना गेली होती. “शेवटच्या क्षणापर्यंत मला लग्नातून माघार घ्यायची होती. लग्न मुंबईत होतं आणि मी लंडनमध्ये होतो. मी शेवटच्या विमानाने भारतात आलो. मी ऐन लग्नाच्या वेळीच पोहोचलो. पूनम खूप काळजीत होती, तिला वाटलं मी लग्न करणार नाही,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

पूनम इतकी तणावात होती की लग्नात ती बेशुद्ध पडली. पूनमला माहित होतं की शत्रुघ्न यांनी रीनासोबतचं नातं संपवलेलं नाही. “जेव्हा मी रीनाबरोबर नात्यात असताना पूनमशी लग्न केलं तेव्हा दोघींपैकी एकीला निवडणं हाच पर्याय माझ्यासमोर होता. मला त्या दोघींपैकी कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. पण अशा भावनिक परिस्थितीतून बाहेर पडायला माणसाला वेळ लागतो,” असं शत्रुघ्न म्हणाले होते. लग्नानंतरही रीनाबरोबर नात्यात असल्याची कबुली त्यांनी दिली होती.
पूनम गरोदर असताना रीना शत्रुघ्न यांना लग्नासाठी विचारत होती. एकदा तर रीनाने शत्रुघ्न यांच्या मोठ्या भावाला यात हस्तक्षेप करायला सांगितलं होतं. त्यांच्या भावानेही प्रयत्न केला, पण शत्रुघ्न पूनमला सोडायला तयार झाले नाही. शेवटी रीना रॉय पाकिस्तानला निघून गेली आणि क्रिकेटपटू मोहसीन खानशी तिने लग्न केलं. पण ते लग्न फार काळ टिकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि रीना भारतात परत आली. तर दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हा पूनमबरोबरच्या संसारात रमले.
