बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा २३ जून रोजी नोंदणी पद्धतीने पार पडला. यानंतर या जोडप्याने बॉलीवूडकरांसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. सोनाक्षीच्या रिसेप्शनला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. रेखा, सलमान खान, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, अर्पिता खान, अनिल कपूर, काजोल, रवीना टंडन असे बरेच कलाकार या पार्टीला उपस्थित होते.

सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या होत्या. सोनाक्षी आणि झहीरचं आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं जात आहे. यामुळे या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरच्या कमेंट्स देखील बंद केल्या आहेत. सुरुवातीला सोनाक्षीच्या कुटुंबीयांचा देखील या लग्नाला विरोध असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यानंतर सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहून जावयाला आशीर्वाद देत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम हृषिकेशच्या खऱ्या आयुष्यातील जानकीला पाहिलंत का? सुमीत पुसावळेची बायकोसाठी रोमँटिक पोस्ट

सोनाक्षीच्या लग्नसोहळ्यातील सध्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेकीने नोंदणी पद्धतीने विवाह केल्यावर मनात काय भावना आहेत याबद्दल टाइम्स नाऊशी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “ही विचारण्याची गोष्ट आहे का? जेव्हा लेकीने स्वत: निवडलेल्या वराशी तिचं लग्न होणार असतं… तेव्हा या क्षणाची प्रत्येक मुलीचे वडील आतुरतेने वाट पाहत असतात. माझी मुलगी झहीरबरोबर सर्वाधिक आनंदी आहे त्यामुळे ते दोघंही कायम आनंदी आणि सुखात राहोत”

हेही वाचा : झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्नामुळे होतंय ट्रोलिंग, सोनाक्षी सिन्हाने उचललं मोठं पाऊल; विवाहाचे फोटो पोस्ट करताना तिने इन्स्टाग्रामवर…

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “४४ वर्षांपूर्वी मी माझ्या आवडीच्या यशस्वी, हुशार आणि सुंदर अशा पूनम सिन्हा यांच्याशी लग्न केलं. आता सोनाक्षीने देखील तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं आहे.”

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेली ७ वर्षे एकमेकांबरोबर आहेत. २३ जून २०१७ मध्ये त्यांनी या नात्याची सुरुवात केली होती. आता बरोबर ७ वर्षांनी सोनाक्षी आणि झहीर विवाहबंधनात अडकले आहेत. अभिनेत्रीने लग्नात आईची साडी नेसून तिचेच दागिने घालून पारंपरिक लूक केला होता. तर रिसेप्शन पार्टीला लाल साडी, केसात गजरा, भांगेत कुंकू या लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.