Shatrughan Sinha Talks About Dhamendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खूप खराब झाली होती आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी नेण्यात आलं आणि आता तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर त्यांना पाहण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या घरी गेले होते.
धर्मेंद्र यांना भेटल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली व त्यांचं कौतुक केलं. धर्मेंद्र व शत्रुघ्न सिन्हा दोघे खूप जवळचे मित्र आहेत. यापूर्वी त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. या व्यतिरिक्तसुद्धा ते इतर ठिकाणीही एकत्र पाहायला मिळाले आहेत.
शत्रुघ्न सिन्हा धर्मेंद्र यांना खूप मानतात आणि त्यांचा आदर करतात. या दोघांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावलेली असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलेलं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलेलं की, त्यांच्या गाजलेल्या शोर मच गया शोर या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ते खूप घाबरले होते आणि त्यावेळी धर्मेंद्र यांनीच त्यांना सल्ला दिला होता.
धर्मेंद्र यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “माझ्या पहिल्या गाण्याचं सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण सुरू होतं, शोर मच गया शोर हे गाणं होतं आणि मी खूप घाबरलो होतो. मी त्यापूर्वी लोकांसमोर कधीच नृत्य केलं नव्हतं. जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा हजारो लोक तिथे उपस्थित होते, त्यामुळे मला कळलं नाही की काय करायचं आहे. मग मी आमच्या मोठ्या बंधूंकडे धर्मेंद्रकडे गेलो आणि सांगितलं की प्लीज मला सांगा हे कसं करू, मला हे जमत नाहीये; तू तुझ्या राफता राफता गाण्याच्यावेळी काय केलं होतं.”
धर्मेंद्र यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना दिलेला सल्ला
शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यावेळी धर्मेंद्र यांनी त्यांना काय सल्ला दिलेला याबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “तसंच कर, जसं मी केलं होतं. ” मग मी विचारलं, “तू काय केलं होतंस?”, तो म्हणाला, “थोडी दारू पी.” पुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलेलं की, “मला असं वाटतं की, त्याच्या कामातून, कृतीतून त्याने जो आदर कमावला आहे, तो कित्येक लोकांनी आजही कमावलेला नाही.”
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा व धर्मेंद्र यांनी आजवर अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पदार्पणातील चित्रपटात धर्मेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. त्यांनी आजवर ‘प्यार ही प्यार’, ‘ब्लॅकमेल’, ‘यमला पगला दिवाना’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
