‘शोले’ आणि ‘दीवार’सारखे चित्रपट केवळ अमिताभ बच्चन यांच्या करिअरसाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं, आजही लोकांना यातील प्रत्येक संवाद अगदी तोंडपाठ आहेत. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का, की हे दोन्ही चित्रपट याआधी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना ऑफर झाले होते. इतकंच नव्हे तर रमेश सिप्पी यांनी ‘शोले’साठी शत्रुघ्न यांची बरीच वाटही पहिली होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आज तक’शी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “शोलेमधील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम मला विचारण्यात आलं होतं. रमेश सिप्पी यांनी त्यांच्या पुस्तकात तसा उल्लेखही केला होता. मी त्यावेळी चित्रपटासाठी तारखा बघत होतो, पण काही केल्या मला वेळ काढता येत नव्हता कारण तेव्हा मी बरेच चित्रपट करत होतो. मी माझ्या कामात व्यस्त होतो आणि रमेशजी त्यांना नेमके किती दिवस शूटिंगसाठी हवे आहेत हे सांगू शकत नव्हते. त्यांना माझ्या सर्व तारखा हव्या होत्या, पण मला ते शक्य नव्हतं.”

आणखी वाचा : “माझ्या मांड्या जाड…”, अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेअर केला ‘तो’ विचित्र अनुभव

पुढे शत्रुघ्न म्हणाले, “मला वाटतं मी तो चित्रपट करायला हवा होता याची मला खंत आहे. पण मी अमिताभ बच्चन यांच्यासाठी फार खुश आहे की त्यांना एवढा मोठा ब्रेक यातून मिळाला अन् रातोरात ते स्टार झाले.” पुढे ‘दीवार’ चित्रपटाबद्दलचाही अनुभव शत्रुघ्न यांनी सांगितला. ते म्हणाले, “दीवार चित्रपटासाठीही मला विचारणा झाली होती, पण मी तो चित्रपटही करू शकलो नाही. अमिताभ यांनी या दोन्ही चित्रपटात उत्तम काम केलं आहे. मी हे चित्रपट करायला हवे होते. मी आजवर हे दोन्ही चित्रपट पाहिलेले नाहीत, कारण मला माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप आजही होतो.”

मनोज कुमार यांचा ‘शोर’ चित्रपटही शत्रुघ्न सिन्हा यांना ऑफर झाला होता, खुद्द मनोज कुमार हे बऱ्याचदा शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी यायचे. त्यांना शत्रुघ्न यांच्याकडून आठ महीने या चित्रपटासाठी हवे होते, पण चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल १६ महीने लागले. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या हातून तो चित्रपटही निसटल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून देणारे ‘शोले’ आणि ‘दीवार’ हे दोन्ही चित्रपट नाकारल्याचं दुःख हे आजही शत्रुघ्न सिन्हा यांना होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha regrets saying no to sholay and deewar he never watched these films avn
First published on: 23-02-2024 at 08:10 IST