Sheeba Chadha in Ramayan movie : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातून झळकणारे अनेक कलाकार चर्चेत आले. रणबीर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी प्रभू श्रीरामांच्या पत्नी सितेच्या, सनी देओल हनुमानाच्या तर अभिनेता यश रावणाच्या भूमिकेतून झळकणार आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शीबा चड्ढासुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
शीबा चड्ढाने हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. ५३ वर्षांच्या शीबाने आतापर्यंत विविध कलाकृतींमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का ती बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या कॉलेजमध्ये होती. दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ती शाहरुखपेक्षा वयाने लहान असून कॉलेजमध्ये ती शाहरुख खानची ज्युनिअर होती.
शाहरुख खानपेक्षा वयाने लहान असूनही शीबाने दोन चित्रपटांत अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारली आहे. फक्त शाहरुख खानच नव्हे तर दिग्दर्शक अनुराग कश्यपसुद्धा त्याच कॉलेजमध्ये होता आणि तो शीबाच्याच वर्गात होता. माध्यमांच्या वृत्तानुसार शीबाने १९९८मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने शाहरुख खान व मनिषा कोईराला यांच्या ‘दिल से’ या चित्रपटात काम केलं होतं. परंतु, यामध्ये तिने मनिषा कोईरालाच्या बॉडी डबलचं काम केलं होतं.
या चित्रपटांत साकारली शाहरुखच्या आईची भूमिका
शीबाने २०१७मध्ये आलेल्या शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘रईस’ चित्रपटात आणि २०१८मध्ये आलेल्या ‘झिरो’मध्ये शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘दिल से’ या चित्रपटात जरी शाहरुखबरोबर काम करता आलं नसलं तरी ‘रईस’ आणि ‘झिरो’मध्ये तिने अभिनेत्यासह काम केलं. शीबाने या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने आतापर्यंत ‘बधाई हो’, ‘गली बॉय’, ‘बॅड न्यूज’, ‘तलाश’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. तर ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
चित्रपटांसह शीबाने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तिने ‘कस्तुरी’ आणि ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. ‘पवित्र रिश्ता’मधील त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे हिंदी चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे.
‘रामायण’मध्ये साकारणार मंथराची भूमिका
दरम्यान, शीबा चड्ढा आता येत्या काळात रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या नितेश तिवारी दिग्दर्शित आणि निमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये ती मंथराची भूमिका साकारणार आहे.
