‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचं शुक्रवारी (२७ जून रोजी) ४२ व्या वर्षी निधन झालं. तिच्या निधनाने कुटुंबियांसह फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. शेफाली बेशुद्धावस्थेत घरात आढळली होती. शेफालीची जवळची मैत्रीण पूजा घई हिने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, ते सांगितलं.
शेफालीच्या मृत्यूपूर्वीच्या काही तासांत काय घडलं होतं? याबद्दल पूजाने विकी लालवानीला तपशीलवार माहिती दिली. शेफालीचा पती, अभिनेता पराग त्यागीने पूजाला जे सांगितलं ते असं की शुक्रवारी त्यांच्या घरी पूजा होती. शेफालीचे पार्थिव घरी आणले तेव्हाही पूजेची सजावट तशीच होती.
घर पूजेसाठी सजवलं होतं
पूजा म्हणाली, “दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला अंत्यसंस्कार करण्यासाठी शेफालीचे पार्थिव घरात आणण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा मी पाहिलं की संपूर्ण घर पूजेसाठी सजवलं गेलं होतं. त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यासाठी सुंदर सजावट केली होती.” शुक्रवारी शेफालीने जेवण केलं आणि पती परागला पाळीव श्वानाला फिरायला घेऊन जाण्यास सांगितलं. पराग खाली गेल्यावर लगेच त्याला वर बोलावण्यात आलं होतं.
मदतनीसने परागला केला फोन
“घरातील मदतनीसाने परागला फोन केला आणि ‘दीदीला बरं वाटत नाहीये,’ असं सांगितलं. फोनवर शेफाली त्याला म्हणाली, ‘तू वर येऊन माझी काळजी घे’.” असं पूजाने सांगितलं. परागने मदतनीसला श्वानाला फिरायला घेऊन जाण्यासाठी खाली बोलावलं. पराग लिफ्टजवळ थांबला, मदतनीस आल्यावर तो वर शेफालीजवळ गेला.
शेफालीच्या हृदयाचे ठोके सुरू होते, पण…
“पराग म्हणाला की तिच्या हृदयाचे ठोके सुरू होते. पण तिचे डोळे उघडत नव्हते आणि तिचं शरीर मृत असल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे परागल लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. तो लगेच तिला रुग्णालयात घेऊन गेला…पण बेलेव्ह्यू हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता,” असं पूजा म्हणाली.
शेफालीला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर कूपर रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि ओशिवारा हिंदू स्मशानभूमीत तिला कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींनी अखेरचा निरोप दिला.