“आत्मरचरित्र लिहावं, असं काही खास माझ्या आयुष्यात घडलेलं नाही. मी अशी गोष्ट सांगायचं ठरवलं ज्याचे अधिकार फक्त माझ्याकडेच आहेत. मी हे पुस्तक अतिशय अद्भुत किंवा उत्कृष्ट असेल असा दावा करत नाही, पण मी पूर्ण प्रामाणिकपणे लिहिलंय इतकं मात्र नक्की,” असं शेफाली शाहने तिच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाबद्दल म्हटलंय. ‘द ऑडॅसिटी ऑफ बिइंग’ या आपल्या आत्मचरित्रात शेफाली शाहने तिच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल लिहिलंय.

“मी पुस्तकात कोणाचंही नाव घेतलेलं नाही. काय घडलं किंवा काय नाही, याबद्दलही मी लिहिलेलं नाही. लोक लग्न करतात तेव्हा ते घटस्फोटाची मानसिक तयारी करून लग्न करत नाहीत. अर्थात घटस्फोटासाठी कोणीही तयार नसतं, त्यामुळे तेव्हा सर्वसाधारणपणे काय परिस्थिती निर्माण होते, यावरच मी लिहिलं आहे,” असं शेफाली शाह ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत म्हणाली.

शेफाली शाहचं पहिलं लग्न व घटस्फोट

शेफालीचं पहिलं लग्न अभिनेता हर्ष छाया याच्याशी झालं होतं. पण ६ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. पुढे २००० मध्ये शेफालीने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांच्याशी लग्न केलं. त्यांना आर्यमन आणि मौर्य ही दोन मुलं आहेत.

लपवण्यासारखं काहीच नाही – शेफाली शाहचं घटस्फोटाबद्दल वक्तव्य

शेफालीच्या मते, “आयुष्यभर सुखाचा संसार करू” असा विचार करूनच लोक लग्न करतात. “आपण जसा विचार करून लग्न करतो, तसंच ते होईल असं नसतं. मग अशा परिस्थितीत त्या गोष्टीचा सामना करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही,” असं शेफालीने नमूद केलं. आपलं आयुष्य आणि घटस्फोटाबद्दल इतक्या उघडपणे लिहिण्याबाबत विचारल्यावर शेफाली म्हणाली, “यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं. मला वाटतं की मी याबद्दल अत्यंत आदराने लिहिलंय. मी माझ्या एकटीबद्दलच लिहिलेलं नाही, तर कोणतंही लग्न जेव्हा मोडतं तेव्हा शेवटच्या टप्प्यात काय घडतं, त्याबद्दल लिहिलंय. तुमचं लग्न मोडतंय याची जाणीव जेव्हा होते, तो काळ कसा असतो याबद्दल मी लिहिलं आहे. त्यामुळे मला वाटतं की, हे एका नात्याच्या अपयशाबद्दल आहे.”

शेफाली शाहच्या या पुस्तकात तिच्या आयुष्यातील इतर बऱ्याच प्रसंगांचा उल्लेख आहे. प्रेम, प्रेमामुळे झालेला त्रास, घटस्फोट आणि दुसरं लग्न, मैत्री आणि समाज, बॉलीवूड अभिनेत्री म्हणून वाढणारं वय, बॉडी इमेज आणि पालकत्वातील आव्हानं या विषयांवरही शेफालीने लिहिलंय. पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींचा वाचक त्यांच्या पद्धतीने अर्थ लावू शकतात, याची पूर्ण कल्पना शेफालीला आहे. “जेव्हा तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावर असता, मग तो अभिनय असो, काही लिहिलेलं असो वा अगदी इन्स्टाग्राम पोस्ट असो, लोकांचे त्याबद्दल स्वतःचे मत असणारच,” असं शेफाली शाह म्हणाली.

दरम्यान, शेफाली शाहच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ३ दशकांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. ‘सत्या’, ‘मॉन्सून वेडिंग’, ‘दिल धडकने दो’, ‘जलसा’ आणि ‘डार्लिंग्स’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. त्याचबरोबर एमी पुरस्कार विजेती ‘दिल्ली क्राईम’ या सीरिजमध्येही तिने दमदार भूमिका साकारली होती.