Shehnaaz Gill Raghav Juyal Relationship : ‘बिग बॉस’मधून घराघरांत पोहोचलेली शहनाज गिल आज बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेचा विषय ठरतं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राघव जुयालबरोबर तिच्या नात्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. दोघांचा हातात हात घालून फिरताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. अखेर त्यांच्या नात्यावर शहनाज गिलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत तिची भूमिका मांडली आहे.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शहनाज गिलने कामासह वैयक्तिक आयुष्याबाबत गप्पा मारल्या आहेत. सिनेविश्वातील अनुभव सांगत तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. शहनाज ही तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असून सिद्धार्थ शुक्लानंतर तिच्या आयुष्यामध्ये आता कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये नेहमी उत्सुकता असते. मात्र, वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे कोणाला न सांगितलेलेच जास्त चांगले असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. राघव जुयाल आणि तिच्या नात्याबाबत प्रश्न विचारताच पहिल्यांदाच शहनाज हिने उत्तर देत ते चांगले मित्र असल्याचे सांगितले.

मुलाखतीवेळी शहनाजला राघव जुयालबरोबरच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, यावर शहनाज म्हणाली, “वैयक्तिक प्रश्न विचारू नका. मी फक्त एवढंच सांगेन की, लवकरच त्याचा ‘भाई तेरा स्टार है’ चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यामुळे त्याला भरभरून पाठिंबा द्या. त्याचा चित्रपट हिट होणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच तो मुख्य अभिनेता म्हणून काम करतोय, त्यामुळे त्याला आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं आहे.

तो या इंडस्ट्रीतून आलेला मुलगा नाही – राघव

पुढे ती म्हणाली, “राघवच्या नव्या चित्रपटाला आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो या इंडस्ट्रीतून आलेला मुलगा नाही. तो आज जो काही आहे, ते स्वतःच्या मेहनतीने आहे, त्यामुळे सर्वांनी त्याचा सिनेमा नक्की पाहा, ‘भाई तेरा स्टार है’ सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्या.”

शहनाज गिल राघव जुयालच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासह दिसली होती. दोघांचा हातामध्ये हात घेत चालत येत असलेला आणि गाडीमध्ये बसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. लवकरच राघव जुयालचा ‘भाई तेरा स्टार है’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याचबरोबर शहनाजचा ‘इश्कनाम’ सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये तिने पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली आहे.