बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने आणि नृत्यामुळे अनेकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांचा खूप आदर करतात आणि अनेकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. तर त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्यांचं कौतुकही करताना दिसतात. अशातच आता अभिनेते शेखर सुमन यांनीही रेखा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

शेखर सुमन यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘उत्सव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शशी कपूर निर्मित या चित्रपटात रेखा यांनी वसंतसेना ही भूमिका साकारली होती. उज्जैनमध्ये राहणाऱ्या गरीब चारुदत्त (शेखर सुमन) आणि वसंतसेना यांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित होता. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत शेखर यांनी रेखा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.

शेखर सुमन यांनी केलं रेखा यांचं कौतुक

शेखर म्हणाले, “रेखाजींनी पहिल्या दिवसापासूनच मला खूप चांगली वागणूक दिली. काही कलाकार स्वतः भोवती मोठा लवाजमा घेऊन फिरतात आणि आपण मोठे स्टार असल्याचा आव आणतात. अशा वेळी नवख्या कलाकाराला संकोच वाटतो, पण रेखाजी तशा नव्हत्या. त्या माझ्या शेजारी बसायच्या, माझ्याशी गप्पा मारायच्या आणि मला संकोच वाटणार नाही याची काळजी घ्यायच्या. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर उभं राहण्यापूर्वीच माझा सगळा ताण दूर झाला होता.”

याचं श्रेय त्यांनी दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनाही दिलं. ते म्हणाले, “गिरीशजींनी मला सांगितलं होतं, ती रेखा आहे असं समजू नकोस. ती फक्त वसंतसेना हे पात्र आहे, असंच समज. त्यामुळे काम करणं खूप सोपं झालं.”

शेखर यांनी रेखा यांचं कौतुक केलं. “इंटिमेट दृश्यांच्या चित्रीकरणावेळी त्यांनी कधीही स्टार असल्याचा आव आणला नाही. इथे हात लावू नका किंवा पुन्हा टेक देणार नाही अशा कोणत्याही अटी त्यांनी घातल्या नाहीत. त्या अतिशय साध्या आणि व्यावसायिक होत्या,” असं शेखर यांनी सांगितलं.

दरम्यान, याच मुलाखतीत शेखर सुमन यांनी माधुरी दीक्षित व डिंपल कपाडिया यांच्याबरोबर काम करण्याचाही अनुभव सांगितला आहे. शेखर सुमन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे.