Madhuri dixit and shekhar suman : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने अनेक दशके सिनेविश्वावर राज्य केले. माधुरीचा अभिनय, नृत्य आणि सौंदर्यामुळे तिने बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये कामाला सुरुवात करताना माधुरीने कठीण काळदेखील अनुभवला आहे. सुरुवातीच्या संघर्षमय काळामध्ये माधुरीने चित्रपट निर्मात्यांच्या आग्रहामुळे कमी मानधनामध्ये तर काम केलेच; पण त्याचबरोबर सोई-सुविधा नसताना चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले. एकदा अभिनेत्याच्या पत्नीचे कपडे देखील चित्रपटासाठी वापरले असल्याचे अभिनेते शेखर सुमनने सांगितले होते.

सुरुवातीच्या काळात केला अर्थिक अडचणींचा सामना

१९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानव हत्या’ चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित आणि शेखर सुमन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट शेखर सुमन आणि माधुरी दीक्षित या दोघांचाही दुसराच चित्रपट होता. तोपर्यंत दोन्हीही कलाकरांना प्रसिद्धी मिळाली नव्हती. सिनेविश्वात माधुरी तर अगदीच नवी अभिनेत्री होती. त्यामुळे निर्मात्यांचे बजेट कमी असतानाही माधुरी व शेखर यांनी चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मान्य केले. मात्र कलाकारांच्या खर्चाचेही पैसे निर्मात्यांकडे नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेखर सुमन यांनी ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी ‘मानव हत्या’ चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या होत्या.

कमी मानधनामध्ये स्वीकारली भूमिका

शेखर सुमन यांनी सांगितले होते की, मानव हत्या चित्रपटाच्या निर्मात्याचे बजेट इतके कमी होते की त्यांना फक्त पाच हजार मानधन दिले होते. यामुळे निराशा झाली असली तरी त्यांनी ते स्वीकारले. यावेळी निर्मात्यांनी त्यांच्यासह माधुरी दीक्षित भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आणि ती देखील नवीन कलाकार होती. तरी देखील शेखर सुमन यांनी चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला होता. कारण यापूर्वी रेखा यांनी देखील शेखर नवीन असताना त्यांच्यासह पहिल्या चित्रपटामध्ये काम केले. यामुळे शेखर सुमन यांनी माधुरीसह स्क्रीन शेअर करण्यास होकार दिल्याचे सांगितले.

केवळ २५०० रुपये मानधन दिले तरीही काम करेन – शेखर

पुढे शेखर सुमन म्हणाले होते की, जेव्हा मी या क्षेत्रात नवखा होतो, तेव्हा रेखा यांनी माझ्यासह काम केले. त्यामुळे मी दुसऱ्या एखाद्या नवख्या कलाकारासह काम का करू नये? म्हणून मी कामासाठी होकार दिला आणि माधुरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो. त्यावेळी ती अंघोळीला गेली होती. त्यामुळे तिला बाहेर यायला थोडा वेळ लागला. जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा ती अत्यंत तेजस्वी आणि मोहक दिसत होती. हे पाहून मी दिग्दर्शकाला गमतीने म्हणालो होतो की, जरी तुम्ही केवळ २५०० रुपये मानधन दिले, तरीही तुमच्या चित्रपटात नक्कीच काम करेन. अर्थात, ही फक्त एक मस्करी होती, असे शेखर सुमन यांनी जुन्या मुलाखतीमध्ये सांगितले.

माधुरीने परिधान केले शेखर यांच्या पत्नीचे कपडे

त्याचबरोबर निर्मात्यांकडे कमी पैसे असल्यामुळे शेखर सुमन यांच्याच घरामध्ये चित्रपटाचे शूटिंग झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉस्ट्यूम्स, मेकअप आर्टिस्ट किंवा वाहतुकीचा खर्च करणेही बजेटमध्ये परवडत नव्हते. यावेळी शेखर सुमन यांची पत्नी मदतीसाठी पुढे आल्या. चित्रपटात माधुरीने शेखर यांच्या पत्नीचे कपडे परिधान केले होते, तर तिच्या मेकअपची जबाबदारीही शेखर यांच्या पत्नीनेच सांभाळली असल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले.

निरागस अशी महाराष्ट्रीय मुलगी – शेखर

हा किस्सा सांगताना शेखर म्हणाले की, माधुरीला सेटवर आणण्यासाठी निर्मात्यांकडे टॅक्सीचे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मला माधुरीला सेटवर आणण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे मी माधुरीला तिच्या घरातून सेटवर घेऊन येत असे. माधुरी दीक्षित ही खरोखरच एक अत्यंत गोड आणि निरागस अशी महाराष्ट्रीय मुलगी होती, असे मत अभिनेते शेखर सुमन यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.