अभिनेत्री कंगना रणौत आणि शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांचे नाते २००८-२००९ च्या सुमारास बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत होते. दोघांचं नातं जितक्या वेगाने बहरले, तितक्याच कटू पद्धतीने त्याचा शेवट झाला होता. दोघांच्या नात्याबद्दल आजही बोललं जातं, कारण ब्रेकअपनंतर अध्ययनने बरेच आरोप केले होते.
कंगना आणि अध्ययन यांची भेट ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि शूटिंग दरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी अध्ययन सुमन केवळ २० वर्षांचा होता आणि बॉलिवूडमध्ये त्याचे करिअर नुकतेच सुरू झाले होते.
कंगना व अध्ययन यांनी एकमेकांना २००८ मध्ये डेट केलं होतं. पण वर्षभरातच त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, २०१६ मध्ये जेव्हा हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला, तेव्हा अध्ययनने कंगनावर अनेक गंभीर आणि धक्कादायक आरोप केले होते. अध्ययन सुमनने डीएनएला एका मुलाखतीत म्हटलं होतं की कंगनाने त्याच्यावर काळी जादू केली होती.
अध्ययनने कंगनावर केले होते आरोप
अध्ययनने आरोप केला की कंगना त्याला मारहाण करायची आणि शिवीगाळ करायची. एकदा तिने त्याला सँडलने मारल्याचेही त्याने सांगितलं होतं. अध्ययन आणि त्याचे वडील शेखर सुमन यांनी असा दावा केला होता की, कंगनाने अध्ययनवर काळी जादू केली होती. कंगना त्याला एका ज्योतिषाकडे घेऊन गेली होती आणि त्याच्या जेवणात काही तरी मिसळायची.
शेखर सुमन यांचा नात्याला होता विरोध
अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी या नात्याला नेहमीच विरोध केला होता. त्यांच्या मते, कंगनासोबतच्या नात्यामुळे अध्ययनचे करिअर उद्ध्वस्त झाले आणि तो नैराश्यात गेला होता. अलीकडच्या काही मुलाखतींमध्ये शेखर सुमन यांनी असेही म्हटलं होतं की, आता ते सर्व गोष्टी विसरून पुढे गेले आहेत आणि कंगनाबद्दल त्यांच्या मनात आता कोणताही राग नाही.
शेखर सुमन कंगना व अध्ययनबद्दल काय म्हणाले होते?
“आपण सर्वजण आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. जे आज बरोबर दिसतंय ते उद्या बरोबर दिसेलच असं नाही, त्याउलटही घडतं. खरंतर कोणालाच रिलेशनशिप, ब्रेकअप आणि नंतर त्यातून सावरत पुढे जावं असं वाटत नाही. प्रत्येक जोडप्याला आपलं नातं कायमस्वरुपी, घट्ट व पवित्र असावं असं वाटतं. नियतीच्या मनात जे असतं ते घडतं आणि तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं. कंगना आणि अध्ययन एकत्र असताना खूप आनंदी होते, पण नंतर ते वेगळे झाले आणि आपापल्या आयुष्यात पुढे गेले. जे व्हायचं होतं ते झालं. त्यामुळे आता त्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल वाईट भावना नाहीत. कधीकधी परिस्थितीमुळे काही गोष्टी घडतात पण त्याकडे वळून बघताना प्रेमाने पाहायला पाहिजे,” असं शेखर सुमनने म्हणाले होते.
“आम्ही कुटुंबीय व अध्ययन या गोष्टी मागे सोडून आयुष्यात पुढे गेले आहोत. त्यांच्या आयुष्यातील हा एक टप्पा होता. त्यावर बोलणारे आम्ही कोण? सगळे आपापल्या मार्गाने गेले आहेत आणि प्रत्येकजण आपला आनंद आणि समाधानासाठी काम करत आहे. मागे फिरणं किंवा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आता एकमेकांकडे बोट दाखवून ‘हे बरोबर आहे’ किंवा ‘हे चुकीचं आहे’ असं म्हणण्यात काही अर्थ नाही,” असं शेखर सुमन म्हणाले.

