Shekhar Suman on Shah Rukh Khan: शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. शाहरुख खान फक्त त्याच्या अभिनयामुळेच नाही तर त्याच्या स्वभावामुळेदेखील सर्वांचा लाडका आहे. तो सर्वांशी नम्रतेने वागतो, आदराने वागवतो, मान-सन्मान देतो, तो त्याच्या कामाप्रति समर्पित असतो अशा अनेक गोष्टींमुळे शाहरुख खान फक्त चाहत्यांचाच नाही, तर कलाकारांचादेखील आवडता आहे.
अनेक कलाकार शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. त्याच्याबरोबर काम करताना तो इतर कलाकारांना कसे वागवतो, याबद्दल ते सांगतात.
“मी हे पैशांसाठी …”
आता अभिनेते शेखर सुमन यांनी शाहरुख खानबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “मला आठवतं की, शाहरुख खान चलते चलते हा सिनेमा बनवत होता. चित्रपटातील कॉमेंट्रीसाठी त्याला माझ्या आवाजाची गरज वाटत होती. जेव्हा चित्रपटाचा टीझर आला, तेव्हा त्यानं मला फोन केला. तो म्हणाला की, तू यासाठी व्हॉइसओव्हर करावास, असं मला वाटतं. त्यावर मी होकार दिला. मी गेलो आणि माझं काम पूर्ण केलं.”
शेखर सुमन पुढे म्हणाले, “त्यांनी मला मोठी रक्कम असलेला चेक पाठवला. मी म्हणालो की, हे बघ ही दोन मित्रांमधील गोष्ट आहे. तुला माहीत आहे की, मी हे पैशांसाठी केलं नाही; पण त्यानं ते ऐकलं नाही. त्यानं मला एक महागडं घड्याळ दिलं. ते घड्याळ अजूनही माझ्याकडे आहे. तो खूप सुंदर क्षण होता.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी खुलासा केला होता की, शाहरुखबरोबर देवदास या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. पण, त्या सिनेमात त्यांनी काम करण्यास नकार दिला. इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “संजय लीला भन्साळी यांनी देवदास सिनेमात मला चुन्नीलाल ही भूमिका साकारण्यासाठी विचारले होते; पण मी तेव्हा नकार दिला होता. जॅकी श्रॉफ यांनी ती भूमिका साकारली आणि त्यांनी ती उत्तमरीत्या साकारली. मला पश्चात्ताप झाला होता की, मला संजय लीला भन्साळींबरोबर काम करता आलं नाही; पण माझी इच्छा ‘हिरामंडी’च्या निमित्तानं पूर्ण झाली.”
शेखर सुमन यांची ‘हिरामंडी’मधील भूमिका गाजली. हिरामंडीमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत होते. संजय लीला भन्साळींनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान, शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो लवकरच किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात किंग खानबरोबरच अभिषेक बच्चन, अर्शद वारसी आणि सुहाना खानदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या नवीन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
