शिबानी दांडेकर अख्तरने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने यावेळी आई-वडिलांचा पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत त्यांना खास अंदाजात शुभेच्छाही दिल्या आहेत.

शिबानीची आई-वडिलांसाठी पोस्ट

अभिनेत्री शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही खास फोटो शेअर करत त्यांना सुंदर अशी कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमधून ती म्हणाली, “माझ्या आयुष्यातील दोन आवडत्या व्यक्तींना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! किती भन्नाट प्रवास राहिला आहे हा! या प्रवासातील जवळपास प्रत्येक क्षणाचा भाग बनवल्याबद्दल तुमचे आभार! तुम्ही जितके गोड आहात, तितकेच वेडेही आहात आणि तुम्हा दोघांवरही माझं मनापासून प्रेम आहे.”

या पोस्टवर शिबानीची बहीण अनुशा दांडेकरनेही कमेंट केली आहे. याशिवाय इतर कलाकारांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया देत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासह फराह खानने “खूप गोड”, अमृता सुभाषने “किती गोड दिसत आहेत दोघे”, तर सबा पतौडीने “माशाअल्लाह! लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. अशा कमेंट्स केल्या आहेत.

शिबानी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि अनेकदा असे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. शिबानी अनेकदा तिचा नवरा दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरबरोबरही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार शिबानी व अनुषा दांडेकर यांचे वडील शशीधर दांडेकर हे सुद्धा अभिनेते असून ते ऑस्ट्रेलियात रंगभूमीवर काम करतात. तर तिची आई सुलभा दांडेकर ऑस्ट्रेलियातीलच ऐअरवेससाठी काम करतात.