सेलिब्रिटींचे रेस्टॉरंट्स हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यात सर्वाधिक चर्चा होते ती शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ या रेस्टॉरंटची. ‘बॅस्टियन’मधून दररोज २-३ कोटी रुपयांची कमाई होते, अशा चर्चा सध्या जोरात आहेत. या दाव्यांवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे बिझनेस पार्टनर रणजित बिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत, या जोडीने बॅस्टियनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते मुंबईतील एक अतिशय लोकप्रिय रेस्टॉरंट चेन बनण्यापर्यंतच्या प्रवासावर आणि त्यांच्या भागीदारीवर चर्चा केली. शिल्पा शेट्टी २०१६ मध्ये बॅस्टियन ब्रँडचे संस्थापक रणजित बिंद्रा यांना भेटली होती. सध्या ती या ब्रँडची सह-मालकीण असून या व्यवसायात तिची ५० टक्के भागीदारी आहे.
शिल्पा बॅस्टियनशी कशी जोडली गेली?
शिल्पा शेट्टी ‘बॅस्टियन’ची सह-मालक होण्यापूर्वी, २०१६ मध्ये एक ग्राहक म्हणून तिथे गेली होती. तेव्हाची आठवण तिने सांगितली. शिल्पा म्हणाली, “रणजित आणि मी भेटलो, याचा मला खूप आनंद आहे. २०१६ मध्ये मी जेव्हा तिथे ग्राहक म्हणून गेले होते, तेव्हाच आमची भेट झाली होती. तिथेच आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. त्याने मला सांगितलं की तो वरळीत आणखी एक आउटलेट उघडतोय, तेही नंतर खूप आयकॉनिक रेस्टॉरंट ठरलं. पण मला यामागची खरी गोष्ट सांगायची आहे. खरं तर सुरुवातीला माझा यावर अजिबात विश्वास नव्हता, कारण ती जागा त्यावेळी अगदीच ओसाड होती, पण रणजितला खात्री होती की तो या जागेचे रूपांतर एका अव्वल दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये करेल. आम्ही कोविड काळात हे हॉटेल सुरू केलं आणि तिथूनच ‘बॅस्टियन’ ब्रँड खऱ्या अर्थाने घडला. आज आमच्याकडे चार वेगवेगळ्या ब्रँड्स अंतर्गत एकूण आठ रेस्टॉरंट्स आहेत.”
रणजित बिंद्रा यांनी शिल्पा शेट्टीला पार्टनर म्हणून का निवडलं?
शिल्पा शेट्टीच्या बिझनेस पार्टनर झाल्याने या व्यवसायात एक वेगळीच ऊर्जा आली, असं रणजित बिंद्रा यांना वाटतं. “तिची एनर्जी वेगळीच होती. मी जेव्हा जेव्हा तिच्याशी बोलायचो, तेव्हा मला सकारात्मक वाटायचं. शिल्पाने ‘बॅस्टियन’चा भाग व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि माझा तो निर्णय योग्य ठरला. ती माझ्यासाठी लकी चार्म ठरली आहे,” असं रणजीत बिंद्रा म्हणाले.
हॉटेल व्यवसायात एखाद्या सेलिब्रिटीचे नाव जोडलं जाण्याचं महत्त्व रणजित यांनी सांगितलं. “सेलिब्रिटी असल्याने नक्कीच फरक पडतो, कारण त्यांच्यामुळे तुमच्या ब्रँडला चांगली प्रसिद्धी मिळते. यामुळे लोक तुमच्या ब्रँडला ओळखू लागतात. शिल्पा ही भूमिका चोख बजावते. तिचे सल्ले माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असतात. ती माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारखी आहे, त्यामुळे ती जे काही सांगते, ते मी करतो,” असं रणजीतने नमूद केलं. तसेच या रेस्टॉरंटमधून नफा कमवायला चार वर्षे लागली, असंही ते सांगतात.
बॅस्टियन हॉटेलची दिवसाची कमाई किती?
बॅस्टियन हॉटेल दिवसाला २-३ कोटी रुपये कमावते, अशा चर्चांबाबत रणजित बिंद्रा यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, “हे खरं असतं तर चांगलं वाटलं असतं. पण मला खात्री आहे की एक दिवस हे नक्कीच खरं ठरेल, त्यामुळे आपण काहीतरी चांगलं होईल अशी आशा ठेवूयात.”
बॅस्टियन हॉटेलची एका रात्रीची उलाढाल २-३ कोटी रुपये इतकी आहे, ही चर्चा लेखिका शोभा डे यांनी ‘मोजो स्टोरी’वर केलेल्या विधानानंतर सुरू झाली.
काय म्हणाल्या होत्या शोभा डे?
“मुंबईत रेस्टॉरंटमधून भरपूर कमाई होते. मुंबईतील एका रेस्टॉरंटची एका रात्रीची कमाई २-३ कोटी रुपयांची असते. स्लो नाईटमध्ये २ कोटी रुपये आणि वीकेंडला ३ कोटी रुपयांची उलाढाल होते. मी स्वतः ते पाहण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते; कारण जेव्हा मी हे आकडे ऐकले, तेव्हा मलाच ते खरे वाटले नव्हते,” असं शोभा डे म्हणाल्या होत्या.
रेस्टॉरंटचं नावही नंतर त्यांनी सांगितलं होतं. “मी बास्टियनबद्दल बोलत आहे. हे नवीन बास्टियन आहे. ते २१,००० फूट चौरस फूट जागेत पसरलं आहे. तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला ‘मी कुठे आहे?’ असा प्रश्न पडतो. इथे तुम्हाला शहराचा ३६०° व्ह्यू दिसतो,” असं शोभा डे म्हणाल्या होत्या.
“ते ७०० लोकांसाठी प्रत्येकी दोन सीटिंग देतात आणि एका रात्रीत इथे १,४०० लोक येऊ शकतात. दादरमध्ये बास्टियनच्या बाहेर रस्त्यावर लोक खाली वाट पाहत असतात, इतकी वेटिंग लिस्ट या रेस्टॉरंटबाहेर असते. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये लोक लॅम्बोर्गिनी आणि अॅस्टन मार्टिनसारख्या लक्झरी गाड्यांमध्ये येतात. हे लोक कोण आहेत? मला काहीच माहिती नाही. तिथे ७०० जण जेवत होते, त्यांच्यापैकी एकही चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. काही तरुण होते आणि ते त्यांच्यासाठी टकीलाच्या बाटल्यावर बाटल्या मागवत होते. प्रत्येक टेबलवरील लोक लाखोंमध्ये खर्च करत होते,” असं शोभा डे यांनी सांगितलं होतं.

