Shilpa Shetty Ganapati Visarjan 2026 Dance Video: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षीप्रमाणे थाटामाटात गणरायाचे स्वागत झाले. घरी दीड दिवस गणपती विराजमान झाल्यानंतर आता शिल्पाने वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला आहे. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून शिल्पा शेट्टीने मराठी गाण्यांवर ठेका धरला आहे.
शिल्पा शेट्टी ही मोठ्या उत्साहामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाली. ‘महेश व्हिडीओ जर्नलिस्ट’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिल्पाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती मोठ्या उत्साहात कुटुंबाबरोबर विसर्जन मिरवणुकीत नाचत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी लाल ‘लाल कलरची बांगडी’ या संजू राठोडच्या गाण्यावर शिल्पा शेट्टीने ठेका धरल्याचे दिसून येत आहे.
शिल्पा शेट्टीचा गणपती विसर्जन मिरवणुकीत जबरदस्त डान्स
मोठ्या उत्साहात शिल्पा शेट्टीने कुटुंबातील काही सदस्यांबरोबर विसर्जन मिरवणुकीत नृत्य केले आहे. यावेळी तिचा पती राज कुंद्रा व तिची मुलेसुद्धा उपस्थित होती. विसर्जन मिरवणुकीमध्ये शिल्पाने तिचा मुलगा वियानबरोबरसुद्धा नृत्य केले आहे. शिल्पाचा भन्नाट डान्स व खास अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा विसर्जन मिरवणुकीत ठेका धरलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
यावेळी शिल्पाने पिवळ्या रंगाची आकर्षक अशी साडी परिधान केली आहे. विशेष म्हणजे तिने नऊवारी साडी नेसली असून त्यावरील गुलाबी पैठणीच्या काठामुळे साडीचा लूक आणखी खुलून दिसत आहे. याचबरोबर तिने कंबरपट्टा व इतर दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. अंबाडा हेअर स्टाईल करून तिने माळलेली फुलंही लक्ष वेधून घेत होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीच्या लूकचे व डान्सचे कौतुक केले आहे.
शिल्पा शेट्टी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील व्हिडीओवर नेटकऱ्यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने लिहिले, “एक अभिनेत्री असून किती मर्यादा राखून डान्स करत आहे. महाराष्ट्रीयन मुलीचा डान्स असा असतो.”
