बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा वादात अडकले आहेत. ६० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. याचदरम्यान आयकर विभागाने शिल्पा शेट्टीच्या घरावर छापेमारी केली, अशी बातमी समोर आली. आता या प्रकरणावर शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी तिच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्पा शेट्टीच्या घरावर गुरुवारी छापेमारी झाली, अशा बातम्या येत होत्या. आता तिचे वकील प्रशांत पाटील यांनी या वृत्तांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. छापेमारीचे वृत्त पाटील यांनी फेटाळून लावले आहे. तसेच आयकर विभागाचे अधिकारी शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या घरी का आले होते आणि तिथे नेमकं काय घडलं, याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीच्या घरावर छापेमारी झालेली नाही. आयकर विभागाने शिल्पाच्या घरावर छापेमारी केल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही एक नियमित प्रक्रिया होती, असं वकिलांनी सांगितलं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी कुंद्राच्या कोणतीही छापेमारी झालेली नाही. ज्यांनी सार्वजनिकरित्या दावा केला आहे की या घटना आयकर विभागाच्या छाप्यांशी संबंधित आहेत आणि अशा अफवा पसरवल्या आहेत त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही प्रशांत पाटील यांनी दिला.
सध्या शिल्पाच्या वकिलाच्या निवेदनातून हे स्पष्ट झालंय की तिच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली नाही. दरम्यान, शिल्पा शेट्टीचे नाव आणखी एका प्रकरणात समोर आले आहे. बेंगळुरूमधील तिच्या रेस्टॉरंटवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. पोलिसांनी सांगितलं की तिचे रेस्टॉरंट परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू होते, त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
