बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या संकटात सापडली आहे. गुरूवार, १८ डिसेंबरला प्राप्तीकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. प्राप्तीकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे. या सगळ्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे.

शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या

शिल्पा शेट्टीच्या घरावरील छाप्याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅस्टियन गार्डन सिटी हॉटेलच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीच्या तक्रारींनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये बास्टियन हॉस्पिटॅलिटीमध्ये ५० टक्के हिस्सा खरेदी केला होती. ही कंपनी रणजीत बिंद्रा यांच्या मालकीची आहे. आता तक्रारी आल्यानंतर प्राप्तीकर विभाग बास्टियन पबच्या खात्यांची बारकाईने तपासणी करत आहे असल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

बंगळुरुतही प्राप्तीकर विभागाची छापेमारी झाल्याचं वृत्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरु या ठिकाणीही छापेमारी करण्यात आली आहे. रेस्तराँ आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांचे रेकॉर्ड प्राप्तीकर विभागाकडून तपासले जात आहेत. Bastian Hospitality कंपनी मुंबई, पुणे, बंगळुरु या ठिकाणी बॅस्टियन नावाने क्लब आणि रेस्तराँ चालवते. दरम्यान या सगळ्या प्रकरणात अद्याप शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्रा यांच्यापैकी कुणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याबाबत काही माहिती समोर येते का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.

Award Banner

बॅस्टियन बंद होणार नाही, काय म्हणाली होती शिल्पा शेट्टी?

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिल्पाचे मुंबईतील वांद्रे येथील बॅस्टियन रेस्तराँ बंद होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक क्लिप पोस्ट केली होती, ज्यात तिने, ‘मी बॅस्टियन बंद करत नाही. बॅस्टियनमध्ये आम्ही नेहमीच नवीन पदार्थ खवय्यांसाठी आणले आहेत आणि ते काम पुढेही सुरू राहील. आम्ही एक नव्हे तर दोन नवीन ठिकाणी बॅस्टियन सुरू करण्याची योजना आखत आहोत.’ असं म्हटलं होतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही हिंदी चित्रपट सृष्टीतली अशी अभिनेत्री आहे जिने एक काळ गाजवला आहे. मध्यंतरी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांवर फसवणुकीचेही आऱोप झाले होते. आता रेस्तराँतील आर्थिक अनियमतता आणि करचुकवेगिरी प्रकरणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.