Riteish Deshmukh & Shilpa Shetty : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगभरात १३० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठीसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी रितेशचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

काही कलाकारांनी रितेशचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केल्या होत्या. तर, बॉलीवूडची स्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहिल्यावर रितेशची नजर काढली होती. हा खास व्हिडीओ जिनिलीयाने शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.

रितेशने आजवर बॉलीवूडसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे इंडस्ट्रीतल्या जवळपास सगळ्याच कलाकारांशी रितेशची खूप छान मैत्री आहे. त्यामुळे सलमान खान, संजय दत्तपासून ते अगदी शिल्पा शेट्टीपर्यंत रितेशच्या सिनेमाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं.

जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी… रितेशला कोणाचीही नजर लागू नये म्हणून त्याच्या कानामागे काळा टिळा लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर अभिनेत्रीने शाबासकी म्हणून रितेशची पाठ देखील थोपटली. हा खास व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ‘राजा शिवाजी’ सिनेमाची झलक पाहिल्यावर अशाप्रकारे शिल्पाने रितेशचं कौतुक केलं होतं असंही जिनिलीयाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रितेश लिहितो, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शिल्पा. तुम्ही कायम अशाच आनंदी राहा…आणि हे वर्षही तुमच्यासाठी सुखाचं ठरूदेत. तुम्ही कायमच मला पाठिंबा दिलाय. खूप खूप प्रेम”

दरम्यान, शिल्पा शेट्टीबद्दल सांगायचं झालं तर, आज अभिनेत्री तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करतेय. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील शिल्पा अगदी फिट आहे. त्यामुळे, चाहते तिच्या फिटनेसचं कायमच कौतुक करत असतात.