Shilpa Shetty On Skin Care: त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण दैनंदिन आयुष्यात विविध गोष्टी करत असतो. कधी घरगुती उपाय करतो, कधी महागड्या क्रीम, साबण वापरतो. काही वेळा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. आपल्यापैकी अनेकांना कलाकार त्यांच्या आरोग्याची, केस व त्वचेची कशी काळजी घेतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. कलाकारही त्यांच्या विविध मुलाखतीत त्यांच्या जीवनशैलीबद्दल वेळोवेळी खुलासे करत असतात. ते त्यांच्या केसांची काळजी कशी घेतात, त्यांची त्वचा मऊ व नितळ राहावी यासाठी काय करतात याबद्दलही सांगतात. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने इतरांनी सांगितलेले उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
त्वचेची काळजी कशी घ्यायची? शिल्पा शेट्टी सांगितला उपाय
आता लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एका कार्यक्रमात बोलताना स्कीन केअर टीप दिली आहे. त्वचा चांगली ठेवण्यासाठी कोणती गोष्ट टाळली पाहिजे याबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.
अभिनेत्रीने नुकताच ‘फिल्मीग्यान’शी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “मी जे काही माझ्या त्वचेसाठी वापरते ते घरगुती उपाय असतात, त्यामध्ये लाकडी घाण्याचे तेल असते. एरंडेल तेल वरदान आहे.”
पुढे ती असेही म्हणाली, “मी कधीच माझ्या चेहऱ्यासाठी साबण लावला नाही. माझ्या आईनेही कधी साबण वापरले नाही. ही सर्वोत्तम टीप आहे. तुमच्या चेहऱ्यासाठी कधीही साबण वापरू नका.”
शिल्पा शेट्टी ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. ती योगासने तसेच व्यायामाचे विविध प्रकार करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा तिच्या लवचिकतेची चर्चाही होते. काही वेळा ती चाहत्यांना काही व्यायामाचे प्रकार चॅलेंज म्हणूनही देते.
शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो, व्हिडीओ कायमच लक्ष वेधून घेत असतात. याबरोबरच ती विविध रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही काम करते.
दरम्यान, शिल्पा शेट्टी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून, कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
