शिल्पा शिरोडकर बॉलीवूडमधील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. अनेक बड्या कलाकारांबरोबर तिने काम केलं आहे. अगदी अमिताभ बच्चन ते गोविंदा अशा अनेक अभिनेत्यांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. अशाच एका सुपरस्टारबरोबर तिला काम करण्याची संधी मिळाली होती पण, ऐनवेळी तिच्या वजनामुळे ती संधी तिला गमवावी लागली असं तिने नुकतंच सांगितलं आहे.

अनेकदा रंग, वजन, उंची यावरुनही अनेक कलाकारांच्या हातून अनेक प्रोजेक्ट गेल्याचं आपण ऐकलं आहे. अनेकदा एखाद्या भूमिकेसाठी, कलाकृतीसाठी विचराणा झाल्यानंतर अचानक हातून ती संधी गेल्याचं कलाकार सांगताना दिसतात. असंच काहीसं शिल्पा शिरोडकरबरोबर झालेलं. तिला बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘छैया छैया’ या लोकप्रिय गाण्यासाठी फराह खानने ऑफर दिली होती पण, ऐनवेली तिच्या हातून तिच्या वजनामुळे ही संधी गेल्याचं तिने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ५’मध्ये सांगितलं आहे.

वजनामुळे ‘छैया छैया’मध्ये झळकण्याची संधी हुकली

उल्लेख केलेल्या कार्यक्रमात शोचा होस्ट हर्ष लिंबाचिया शिल्पा शिरोडकरला म्हणाला, “शिल्पा मॅम आम्हाला एक गोष्ट कळलीये की छैया छैया हे गाणं आधी तुम्हाला ऑफर झालं होतं” यावर ती म्हणाली, “हो फराह आलेली तिने त्या गाण्यासाठी विचारलं होतं, ती म्हणालेली एक गाणं आहे १५ दीवस देते वजन कमी कर. मी १५ दिवस उकडलेल्या भाज्या खालल्या. वजन कमी झालं असेल, पण ते फराहला हवं तेवढं कमी झालं नव्हतं. मग ती आली आणि म्हणाली, सॉरी तू अजूनही जाड आहेस आम्ही तुला हे गाणं नाही देऊ शकत. मग मलायकाची यासाठी निवड झाली. मी खोटं नाही बोलणार मी जाड होते म्हणून मला ते गाणं नाही मिळालं. फराह बोलते की माझं वजन १०० किलो होतं, पण असं नाहीये माझं वजन १०० किलो नव्हतं.”

शिल्पाने ‘छैया छैया’ या गाण्याचा हा किस्सा सांगितल्यानंतर टीव्हीवर सगळ्यांसमोर स्पष्टपणे खरी गोष्ट कुठलाही संकोच न ठेवता सांगितल्यामुळे सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. पुढे ‘छैया छैया’ या गाण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोराची निवड झाली. १९९८ मध्ये आलेल्या मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ या चित्रपटातील ‘छैया छैया’ या गाण्यात शाहरुख खान व मलायका झळकले होते. ए.आर.रहमान यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. त्याकाळी हे गाणं प्रचंड गाजलं होतं आणि आजही त्याची क्रेझ कायम असून शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये याचा समावेश आहे.