scorecardresearch

“तुमच्या शहराला पाकिस्तान म्हणाली असती तर?” कंगना रणौतच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात “दिल्लीला…”

संजय राऊतांनी कंगना रणौतबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

sanjay raut on kangana ranaut
संजय राऊतांनी कंगना रणौतबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कंगना रणौत बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना समाजातील घडामोडींवर परखडपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. अनेकदा कंगनाच्या राजकीय वक्तव्यांमुळे वाद निर्माण होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. या वक्तव्यानंतर कंगनावर टीका करण्यात आली होती. आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर मुलाखतीत भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच ‘टीव्ही ९’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना कंगनाच्या मुंबईतील घरावर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. “तुमच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणांचा हा दुरुपयोग आहे, असं तुम्ही म्हटलं होतं. पण कंगनाच्या घरावर कारवाई होत असताना तुम्हाला आनंद होत होता”, असं राऊतांना विचारण्यात आलं.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने खरेदी केली Made In India गाडी; नव्याकोऱ्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का?

कंगनाबाबत विचारलेल्या या प्रश्नावर राऊत उत्तर देत म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे कंगनाच्या घरावर झालेल्या कारवाईचा कोणीही आनंद घेतलेला नाही. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. मुंबईत राहणारा आणि मुंबईवर प्रेम करणारा नागरिक हे सहन करणार नाही. उद्या जर दिल्लीला कोणी पाकिस्तान म्हटलं तर ते ही आम्ही सहन करणार नाही. आम्ही तेव्हाही हेच बोलू. कारण, हा देश पाकिस्तान नाही”.

हेही वाचा>> बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण, राज ठाकरे की एकनाथ शिंदे? संजय राऊत म्हणाले…

काय म्हणाली होती कंगना रणौत?

सप्टेंबर २०२०मध्ये लॉकडाऊनच्या काळात मुंबई महानगरपालिकेने कंगना रणौतच्या मुंबईमधील ऑफिसवर कारवाई करत अनधिकृत बांधकाम केलेल्या भागावर बुलडोझर चढवला होता. या प्रकरणानंतर कंगनाने ट्वीट करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. “काश्मीरी पंडितांची काय अवस्था होत असेल, ते आज मला कळलं. आज मुंबईही पाकव्याप्त काश्मीरसारखी भासत आहे”, असं कंगना म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 16:59 IST
ताज्या बातम्या