छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करने काही दिवसांपूर्वीच तिला लिव्हर ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. तब्येतीबद्दलची माहिती तिने सोशल मीडियामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर केली. परंतु, नंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करीत तिला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं.
दीपिकानं तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. अशातच आता नुकतच दीपिकाचा नवरा अभिनेता शोएब इब्राहिमनं आज सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत शोएब म्हणाला, “मी तुम्हाला काल अपडेट देऊ शकलो नाही. त्यासाठी माफ करा. दीपिकावर शस्त्रक्रिया झाली असून, ती जवळपास १४ तास ओटीमध्ये होती. सुदैवानं सगळं सुरळीत पार पडलं आहे. दीपिका सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला थोडा त्रास होत आहे; पण पूर्वीपेक्षा आता तिची तब्येत बरी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी मी तुमचे आभार मानतो. ती आयसीयूमधून बाहेर आली की, याबाबत मी तुम्हाला कळवेन.”
२८ मे रोजी दीपिका कक्करने तिला कर्करोगाचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. यावेळी तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत म्हटलं होत, “जसं की तुम्हाला माहीत आहे की, गेले काही दिवस माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होते. माझ्या पोटाच्या वरच्या भागात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर असल्याचं मला कळलं; पण नंतर तो स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचं समजलं. माझ्यासाठी हा काळ प्रचंड कठीण आहे. माझ्या कुटुंबियांच्या साथीनं आणि तुमच्या पाठिंब्यामुळे मी यामधून लवकरच बाहेर येइन. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.”
दरम्यान, अभिनेत्रीनं तिच्या नवऱ्यासह त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमधून असं म्हटलं होतं, “शस्त्रक्रियेनंतर मी यामधून बाहेर येईन, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे.” आता नुकतीच अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया झाली असून, ती सध्या आयसीयूमध्ये असल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं आहे.