‘कॉकटेल २’ प्रदर्शित होऊन जवळपास आठवडा उलटला असला तरी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मात्र व्यावसायिक यश मिळूनही प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर लेखिका शोभा डे यांनीही चित्रपटाबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे. शाहीद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं परीक्षण करताना त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामधून त्यांनी रश्मिकाला हिंदी चित्रपट तिच्यासाठी नसल्याचं म्हटलं आहे.
शोभा डे यांना आवडला नाही कॉकटेल २
‘कॉकटेल २’ पाहिल्यानंतर शोभा डे यांनी एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. त्यांनी या चित्रपटाची तुलना ‘कॉकटेल’ या पहिल्या भागाशी करत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आत्ताच कॉकटेल २ पाहून बाहेर पडले. पण हा कॉकटेलचा दुसरा भाग अजिबात वाटत नाही. तो कॉकटेल कुठे आणि हा कुठे! हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा परिणाम विसरण्यासाठी मला पाच नेग्रोनी कॉकटेल्स प्यावी लागतील असं वाटतंय”. शोभा डे यांच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
रश्मिका हिंदी चित्रपटांसाठी बनली नाहीयेस – शोभा डे
पुढे बोलताना शोभा डे यांनी चित्रपटाच्या कथानकावरही टीका केली. मात्र काही कलाकारांच्या कामाचं त्यांनी कौतुकही केलं. त्या म्हणाल्या, “या चित्रपटाला ना डोकं आहे ना शेपूट. कथाच अतिशय विचित्र आहे. शाहिद, तुला नवीन हेअरकटची गरज आहे, पण तरीही तूच या चित्रपटातील सर्वात चांगली गोष्ट आहेस. रश्मिका, माफ कर, पण हिंदी चित्रपट हे कदाचित तुझ्यासाठी योग्य माध्यम नाही. क्रिती, तू खूप सुंदर दिसली आहेस, तुझा स्क्रीन प्रेझेन्सही उत्तम आहे आणि तू चांगलं काम केलं आहेस.”
याशिवाय त्यांनी चित्रपटाच्या लेखनावर आणि मांडणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कथा, व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध याबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली. त्यांच्या मते, चित्रपटातील अनेक गोष्टी विस्कळीत वाटतात आणि कथानक प्रभावीपणे पुढे सरकत नाही. पुढे शोभा डे यांनी चित्रपटाच्या कथानकावर आणखी टीका करत म्हटलं, “कथा थोडी अधिक सखोल आणि अर्थपूर्ण असू शकली नसती का? दोन महिला शाहिदसाठी भांडत असतात आणि मग तो त्यांना सांगतो की त्यानंतर शाहिदच्या पात्राचा एक संवाद येतो ‘प्रेम ही काही दिवस आनंद घेण्याची गोष्ट आहे, प्रेम नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही.’ चित्रपटात अशा प्रकारच्या वरवरच्या ज्ञानाच्या गोष्टी भरलेल्या आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “अधूनमधून काही विनोद चांगले आहेत, पण या चित्रपटाची कॉकटेलशी तुलना करण्याचाही प्रयत्न करू नका. आता मला त्या पाच नेग्रोनींची गरज आहे. हा माझा थोडक्यात आढावा आहे.” शोभा डे यांच्या या प्रतिक्रियेमुळे ‘कॉकटेल २’च्या कथानक, व्यक्तिरेखा आणि प्रेमावरील मांडणीबाबत सोशल मीडियावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
