Mirzapur The Movie review by Shobhaa De : बॉक्स ऑफिसवर जवळपास २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या गुरमीत सिंग दिग्दर्शित ‘मिर्झापूर: द मुव्ही’ या क्राईम थ्रिलर चित्रपटावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी “हा चित्रपट बनवायलाच नको होता, मी १५ मिनिटं झोपले होते” अशी कबुली दिली. ९०० रुपयांचं तिकीट आणि २६० रुपयांची भेलपुरी खाऊन वेळ वाया गेल्याचं सांगत त्यांनी कालीन भय्या म्हणजेच पंकज त्रिपाठी यांच्या एकसुरी अभिनयावर आणि विनाकारण दाखवलेल्या हिंसाचारावर जोरदार निशाणा साधला आहे.
शोभा डे यांनी प्राईम व्हिडीओवरील ‘मिर्झापूर’ ही गाजलेली क्राईम थ्रिलर सीरिज पाहिली नव्हती, पण ‘मिर्झापूर: द मुव्ही’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायचं ठरवलं. शोभा डे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एवढंच मला म्हणायचंय की, मिर्झापूर: द मुव्ही कदाचित बनवायलाच नको होता. मिर्झापूर सीरिजची झालेली चर्चा आणि आताही चित्रपटाची क्रेझ पाहून मी मोठ्या अपेक्षेने चित्रपट पाहायला गेले होते. पण बाहेर पडताना ‘हा काय फालतूपणा चाललाय?’ असा प्रश्न मला पडला.”
शोभा डे यांना आवडला नाही पंकज त्रिपाठींचा अभिनय
शोभा डे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. बब्बन बाबुआ यादवच्या भूमिकेत रवी किशन यांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर गुड्डूच्या भूमिकेत अली फझलनेही कमाल काम केलंय, असं त्यांनी म्हटलं. कालीन भैय्याची भूमिका करणाऱ्या पंकज त्रिपाठींबद्दल शोभा डे म्हणाल्या, “तेच जुने हावभाव आणि तीच जुनी संवादफेक. मिस्टर त्रिपाठी यांनी तीच मिस्टर त्रिपाठींची भूमिका करणं आता खूप एकसुरी झालंय.”
मी १५ मिनिटं झोपले होते – शोभा डे
आपल्या चांगल्या प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंकज त्रिपाठींनी बीना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलबरोबर बोल्ड सीन्स केला आहे, ते पाहून आश्चर्य वाटल्याचं शोभा डे म्हणाल्या. तसेच त्यांनी चित्रपटातील रक्तरंजित सिंहाचार आणि कमकुवत कथेवर टीका केली. “मिर्झापूर पाहताना १५ मिनिटं झोपले होते,” अशी कबुली शोभा डे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोन महिलाही घोरत असल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलंय. “कदाचित हा चित्रपट पुरुषांसाठी बनवला असावा, माझ्यासाठी नक्कीच नव्हता,” असं शेवटी शोभा डे म्हणाल्या.
पैसे आणि वेळ सगळं वाया – शोभा डे
“चित्रपटाच्या तिकिटावर ९०० रुपये, भेळपुरीवर २६० रुपये आणि जवळजवळ चार तास फक्त हा विचार करण्यात घालवले की, मी असा चित्रपट का पाहतेय, ज्यातील अनेक प्रसंग विनाकारण एकमेकांशी जोडले आहेत,” असं शोभा डे यांनी म्हटलंय.
दरम्यान, मिर्झापूर सीरिजवर आधारित चित्रपट ४ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फझल, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदू, हर्षिता गौर, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा आणि राजेश तेलंग, जितेंद्र कुमार आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार आहेत.
