Sholay Samba’s & Raveena Tandon Relation : ७० आणि ८० च्या दशकात सिनेसृष्टीवर खलनायकांचं वर्चस्व होतं. अमरीश पुरी, अमजद खान, प्रेम चोप्रा, रनजीत आणि जीवन यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने मोठं नाव कमावलं. याच काळात कराचीहून मुंबईत आलेला आणखी एका अभिनेत्या खलनायक म्हणून काम केलं आणि वेगळी ओळख निर्माण केली.
या खलनायकाने चित्रपटांमध्ये जरी छोटे-मोठे रोल केले, तरी त्यांच्या अभिनयाचं नेहमी कौतुक झालं. छोट्याशा भूमिकेतही ठसा उमटवण्यासाठी ते ओळखले जात होते. ‘शोले’ चित्रपटानंतर तर त्यांचं नशीब कायमचं बदललं. या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने स्टारडम मिळालं.
‘शोले’मधील सांभाची खरी गोष्ट
क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पाहणारे हे बॉलीवूड स्टार दुसरे कोणी नसून मॅक मोहन (Mac Mohan) होते. ‘जागरण’च्या वृत्तानुसार मॅक मोहन या नावाने प्रसिद्ध असलेल्या मोहन मकिजानी यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी कराची येथे झाला होता. त्यांचं स्वप्न भारतीय क्रिकेटपटू बनण्याचं होतं. यासाठीच ते मुंबईत आले होते. मात्र, नशिबात खलनायक बनणं लिहिलं होतं.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॅक मोहन वेगळं काम करत होते. एकदा त्यांनी थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यांची अभिनयात रुची वाढू लागली. त्यानंतर त्यांनी मुंबईतच अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांचा सहाय्यक म्हणून काम केलं होतं. त्यांना १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला.
२००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या मॅक मोहन यांना सर्वाधिक लोकप्रियता रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ या चित्रपटातून मिळाली. चित्रपटातील तो प्रसिद्ध संवाद आजही अनेकांना आठवतो. जेव्हा गब्बर सिंह (अमजेद खान) विचारतो, “अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर?” तेव्हा सांभा उत्तर देतो, “पूरे पचास हजार.” हा सांभा दुसरा कोणी नसून मॅक मोहनच हेच होते.
रवीना टंडनशी काय नातं होतं?
‘शोले’मधून यश मिळाल्यानंतर त्यांनी डॉन, काला पत्थर, कर्ज, शान आणि क्रोधी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मॅक मोहन हे असे पहिले खलनायक मानले जातात, ज्यांचं खरं नाव सर्वाधिक चित्रपटांमध्ये वापरण्यात आलं. ‘जागरन’च्या वृत्तानुसार फार कमी लोकांना माहित आहे की मॅक मोहन आणि रवीना टंडन हे नातेवाईक होते. मॅक मोहन हे नात्याने रवीना टंडनचे मामा लागतात. एकदा अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिचे मामा तिच्या खूप जवळचे होते. ते नेहमी तिच्यासाठी भेटवस्तू घेऊन यायचे.
