शोले हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला कल्ट क्लासिक सिनेमा आहे. या चित्रपटातली सगळी पात्र अगदी गब्बरपासून सुरमा भुपालीपर्यंत आणि ठाकूरपासून जय-विरु पर्यंत प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. याच वर्षी १५ ऑगस्टला शोले चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. चित्रपटांचा सुवर्णकाळ ज्या चित्रपटापासून सुरु झाला तो शोले चित्रपट आता सुवर्ण महोत्सवी वर्षात आहे. या निमित्ताने हा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
शोलमध्ये कलाकारांची फौज
सलीम जावेद यांची जबरदस्त स्क्रिप्ट, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान, जगदीप, असरानी, सत्येन कपूर, मॅक मोहन, विजू खोटे, ए के हंगल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात होतीच. गब्बर (अमजद खान), ठाकूर (संजीव कुमार), जय (अमिताभ बच्चन), विरु (धर्मेंद्र), बसंती (हेमा मालिनी) राधा (जया भादुरी) यांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. १२ डिसेंबरला नव्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा नवा ट्रेलरही चर्चेत आला आहे.
शोले हा चित्रपटसृष्टीतला कल्ट क्लासिक
शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतला असा चित्रपट आहे ज्याकडे कल्ट क्लासिक म्हणून पाहिलं जातं. शोलेतले संवाद पाठ करणाऱ्या पिढ्या घडल्या आहेत. शोले नसांमध्ये भिनलेला प्रेक्षकही सिनेमागृहांनी पाहिला आहे. खरंतर चित्रपटात हिंसा आहे, त्याचा शेवट चांगला नाही म्हणून समीक्षकांनी सुरुवातीला हा चित्रपट आपल्या लेखणीने धोपटला होता. मात्र सलीम जावेद यांनी आणि जी.पी. सिप्पी यांनी एक निर्णय घेतला आणि सिनेमाचा शेवट बदलला. ज्यामुळे चित्रपट प्रचंड चालला. शोले पाहिला नाही असा भारतातला माणूस सापडणं आजही विरळाच आहे इतकी या चित्रपटाची जादू आजही भारतीय प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. १५ ऑगस्ट १९७५ ही या चित्रपटाची रिलिज डेट. या चित्रपटावरचं प्रेम पिढ्यान् पिढ्या वाढतं आहे. शोलेने मागची पाच दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शोले म्हणजे असा सिनेमा आहे ज्यात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन सगळं आहे.
शोलेतल्या प्रत्येक पात्राचा अभ्यास करुन भूमिका साकारल्या गेल्या आहेत
जी.पी. सिप्पींचं दिग्दर्शन, आर. डी. बर्मन यांचं संगीत, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार आणि त्यांना सहकलाकारांनी दिलेली साथ यामुळे शोलेची भट्टी जी जमून आली आहे त्याला जवाब नाही. ‘शोले’तल्या प्रत्येक कॅरेक्टरवर विशेष अभ्यास करुन ते सिनेमात समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळेच आपल्याला ठाकूर, जय, विरु, बसंती, राधा यांच्या प्रमाणेच जेलर, हरिराम नाई, कालिया, सांबा असे सगळेच लक्षात राहतात. ‘शोले’ अॅमेझॉनवरही प्रदर्शित झाला आहे. तसंच मल्टिप्लेक्स नसताना चित्रपट पुन्हा पुन्हा लागत असत. त्यात शोले जर कुणी आणला तर सिंगल स्क्रिन चालवणाऱ्यांची चांदी असे. अगदी ९० च्या दशकापर्यंत हे सगळं होतंच. आता तर शोले पाहण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय या चित्रपटाच्या सुरस कथाही सगळ्यांना पाठ झाल्या आहेत.
मूळ क्लायमॅक्ससह येतोय शोले
१२ डिसेंबर २०२५ ला म्हणजेच चित्रपटाला साडेपन्नास वर्षे झाल्यानंतर शोले त्याच्या मूळ क्लायमॅक्समध्ये परततो आहे. या चित्रपटाचा मूळ शेवट ठाकूर गब्बरला मारुन टाकतो असा होता. जो अत्यंत हिंसक वाटल्याने बदलण्यात आला होता आणि गब्बरला पोलीस बेड्या घालून घेऊन जातात असं दाखवण्यात आलं होतं. १२ डिसेंबरला येणारा शोले पूर्वीचा शेवट घेऊन परतणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता ५० वर्षांनीही कायम आहे.
