Actress who Started Her Career With Rishi Kapoor: चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडले. मात्र, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांमुळे आजही अशा कलाकारांची चर्चा होताना दिसते.
अशाच कलाकारांपैकी एक शोमा आनंद या आहेत. शोमा आनंद यांचे खरे नाव नीलम अरोरा, असे आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात ऋषी कपूर यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारत केली होती. मात्र, त्यानंतर चलाख रागीट सून अशा भूमिका त्यांनी साकारल्या. त्या भूमिकांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
१९७६ ला प्रदर्शित झालेल्या बारुद या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटात ऋषी कपूर प्रमुख भूमिकेत होते. पहिल्याच चित्रपटातून शोमा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जागीर, कुली अशा गाजलेल्या चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शोमा आनंदचे नाव घेतले जात होते. मात्र, काळानुसार त्यांची ओळख बदलत गेली.
अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याबरोबर केले आहे काम
पुढे शोमा आनंद यांना प्रमुख भूमिका मिळण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्यांना सहायक भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. मात्र, तिथूनच त्यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले आणि त्यांनी नकारात्मक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका प्रचंड गाजल्या. ‘घर एक मंदिर’, ‘घर द्वार’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘बड़े घर की बेटी’ व ‘जैसी करनी वैसी भरनी’सारख्या चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिकांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
१९९० च्या दशकानंतर शोमा आनंद टेलिव्हिजनच्या दुनियेकडे वळल्या. छोट्या पडद्याने त्यांना एक ओळख दिली. त्यांनी हम पाँच या विनोदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. अशोक सराफ यांच्याबरोबर त्या प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. त्याव्यतिरिक्त त्या ‘भाभी’, ‘शरारत’, ‘मायका’, ‘जिनी और जुजू’ व ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसह अनेक टीव्ही शोमध्ये दिसल्या. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटात त्यांनी परेश रावल यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यानंतर त्या क्या कूल है हम व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील दिसल्या.
इंडस्ट्रीपासून त्या दूर का गेल्या, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. ७० व ८० च्या दशकात कुटुंब, नाती व समाज या गोष्टी केंद्रस्थानी होत्या. त्याच काळात शोमा यांनी चित्रपटांत पदार्पण केले होते. मात्र, काळ जसजसा पुढे गेला त्याप्रमाणे अॅक्शन सीन्स, बोल्ड सीन्सची संख्या वाढत गेली. शोमा यांच्या म्हणण्यानुसार त्या अशा चित्रपटांत काम करू शकल्या नसत्या.
त्या म्हणाल्या होत्या, “आज चित्रपटांतील पात्रांची खोली कमी झाली आहे. भावनांची जागा आता उथळपणाने घेतली आहे. ज्या चित्रपटात भावनांना महत्त्व दिले जात नाही, अशा चित्रपटांचा मला भाग व्हायचे नाही.”
शोमा आनंद यांच्या खासगी आयुष्याबद्दलदेखील चर्चा झाली. १९८४ दरम्यान त्यांनी बॉबी नावाच्या एनआरआयशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अभिनेत्रीने त्यावर कधीच वक्तव्य केले नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांनी अभिनेते व दिग्दर्शक तारिक शाह यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. २०२१ मध्ये तारिक शाह यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलगी सारा आणि कुटुंबाला वेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर त्या अभिनय करताना दिसल्या नाहीत.
