Shraddha Kapoor Brother Drug Case : बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचं कुटुंब अनेकदा विविध कारणांनी वादांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाच्या मावशी तेजस्विनी कोल्हापूरे यांनी अशाच एका वादाच्या प्रसंगाबद्दल सांगितलं. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्या घराबाहेर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी श्रद्धाला मोठा धक्का बसल्याचं तेजस्विनी यांनी सांगितलं.

तेजस्विनी यांनी स्पष्ट केलं की, शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता, पण ड्रग्जशी त्याचा कोणताही संबंध नाही. २०२२ मध्ये बंगळुरूमधील एका नामांकित हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या आरोपावरून सिद्धांतला अटक करण्यात आली होती, याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असावी.

या संदर्भात सिद्धार्थ कन्ननशी बोलताना तेजस्विनी म्हणाल्या, “सिद्धांत चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. तो ‘कपूर’ कुटुंबातला असल्यामुळे कदाचित त्याचं नाव लगेच चर्चेत आलं. पहिल्यांदा जेव्हा हे घडलं, तेव्हा मी आणि माझे पती त्याला सोडवायला गेलो होतो. तो त्याच्या मित्रांबरोबर होता आणि आम्ही सगळ्यांना ओळखत होतो. पण मीडियाने हा विषय खूपच वाढवून सांगितला. त्याचं नाव सगळीकडेच आलं.”

एका पार्टीत डीजे म्हणून काम करत असताना तिथे कुणीतरी त्याला ड्रिंक दिलं होतं, असा दावा सिद्धांतने केला होता. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. जेव्हा तेजस्विनी यांना थेट विचारण्यात आलं की, ‘सिद्धांत ड्रग्ज घेतो का?’ तेव्हा त्यांनी ठामपणे “अजिबातच नाही” असं उत्तर दिलं.

याच मुलाखतीत त्यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “एका दिवशी एका राजकीय पक्षाने श्रद्धा आणि सिद्धांतच्या घराबाहेर आंदोलन केलं. घराबाहेर घोषणाबाजी सुरू होती आणि आत घरात श्रद्धा आणि सिद्धांत दोघेही रडत होते. या सगळ्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला होता.”

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात सिद्धांत कपूर २०२४ मध्ये सांगलीतील एका कारखान्यात जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित २५२ कोटी रुपयांच्या केसप्रकरणात मुंबई पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर झाला होता. एका कथित ड्रग्ज पुरवठादाराची चौकशी करताना त्याचं नाव समोर आल्यानंतर त्याला समन्स पाठवण्यात आले होते.