Shraddha Kapoor Birthday : श्रद्धा कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज श्रद्धाचा वाढदिवस आहे. श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
श्रद्धा कपूरने आतापर्यंत तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केलं आहे. श्रद्धा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचं ऑनस्क्रीन वय जास्त असूनही त्या कमी वयाच्या दिसतात. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा कपूर आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु, ३९ व्या वर्षीसुद्धा श्रद्धा कपूर अगदी २५ वर्षांची असल्यासारखी दिसते. यामागे काय रहस्य आहे, तिचं डाएट रुटीन कसं असतं आणि ती स्किन केअरसाठी काय करते याबद्दल जाणून घेऊया…
‘असं’ असतं श्रद्धा कपूरचं डाएट रूटीन
श्रद्धा कपूरच्या डाएट रुटीन आणि तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीबद्दल बोलायचं झालं तर पिंकव्हिलाशी संवाद साधताना अभिनेत्रीने याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. श्रद्धा कपूर नाश्त्याला, दुपारच्या जेवणात आणि रात्री काय खाते अशा एकंदरीत तिच्या डेली रुटीनबद्दल विचारल्यानंतर ती म्हणालेली, “मी भाज्या, डाळ भात आणि पोळ्या खाते. याव्यतिरिक्त कधीकधी मी कॉन्टिनेन्टल आणि इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेते. मी संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान माझं रात्रीचं जेवण उरकून घेते, त्यानंतर मी काही खात नाही, पण जर कधी भूक लागलीच तर मग मी सूप वगैरे पिते.”
श्रद्धा कपूर पुढे म्हणाली, “मी सकाळी लवकर उठते आणि नाश्त्यामध्ये माझी स्वयंपाकी उत्तम पदार्थ बनवते. ती उत्तम साबुदाण्याची खिचडी, पोहे, उपमा, मसाला डोसा चटणी सांबार हे सगळं बनवते. हे सगळं खाते.” आवडत्या खाद्य संस्कृतीविषयी बोलताना श्रद्धा म्हणाली, “मला भारतीय घरगुती जेवण खायला खूप आवडतं.”
श्रद्धा कपूरने या मुलाखतीत पुढे वर्कआउट करण्याबद्दलही सांगितले आहे. अभिनेत्रीला दिवसातून तुला कधी वर्कआउट करायला आवडतं असे विचारल्यानंतर ती म्हणाली, “संध्याकाळी ७ च्या दरम्यान मी व्यायाम करते किंवा दिवसभरात मला जेव्हा असं वाटेल की माझ्यामध्ये व्यायाम करण्यासाठी ऊर्जा आहे तेव्हा मी व्यायाम करते. काही लोकांना सकाळी व्यायाम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि ताकद असते, काहींना संध्याकाळी असते.” श्रद्धाने यावेळी ती प्रोसेस्ड फूड आणि तळीव पदार्थ जसे की फ्राइड चिप्स फार खात नाही असं म्हटलं आहे. यावेळी तिने तिला दिवसभरात कधीही हलकीशी भूक लागल्यानंतर ड्रायफ्रूट खायला खूप आवडतात असं म्हटलं आहे.
स्कीन केअरची ‘अशी’ घेते काळजी
‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत स्कीन केअर रूटीनबद्दल विचारल्यानतंर श्रद्धा म्हणालेली, “मी पाणी पिते, पण मला असं वाटतं की मी अजून पाणी प्यायला हवं, त्याने त्वचा चांगली राहते, पुरेशी झोप घेते. निथळ त्वचेसाठी तेसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असणं. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमची त्वचा आपोआप खुलते आणि तेच खूप महत्त्वाचं स्कीन केअर आहे.”
