Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री २’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर तर तिची लोकप्रियता इतकी वाढलीये की तिने फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकलं आहे. गेल्या काही वर्षांत श्रद्धाचे जे सिनेमे आले, ते बॉक्स ऑफिसवर विशेष काही कमाल करू शकले नव्हते. मात्र, ‘स्त्री २’ प्रदर्शित झाल्यापासून बॉलिवूडमध्ये श्रद्धाचे ‘अच्छे दिन’ आल्याचं बोललं जातंय. ‘स्त्री २’ ने एका आठवड्यात २७५ कोटींची कमाई केली असून हा सिनेमा चारशे कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. एकूणच, श्रद्धाचं नशीब आता फळफळलंय असं दिसतंय, कारण ही स्त्री आता ‘क्रिश ४’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘क्रिश ४’ सिनेमाची चर्चा आहे. ‘क्रिश ४’ हा सिनेमा सुपरहिरोवर आधारित असणार असून, यात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असणार आहे. २००३ मध्ये आलेला ‘कोई मिल गया’, २००६ मध्ये आलेला ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये आलेला ‘क्रिश ३’ हे या सिनेमाचे तीन भाग होते. पहिल्या सिनेमात हृतिकची नायिका प्रीती झिंटा होती, तर पुढील दोन भागांत प्रियांका चोप्राने मुख्य नायिकेची भूमिका बजावली होती. आता चौथ्या भागात श्रद्धा कपूर हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत असेल, अशी चर्चा होती.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या सर्व अफवा खोट्या आहेत. ‘क्रिश ४’ सिनेमासाठी कास्टिंग प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. या सिनेमाच्या प्रॉडक्शन टीममधील एका सूत्राने ही माहिती दिली. राकेश रोशन ‘क्रिश ४’ चं दिग्दर्शन करणार असून त्यांनीच या आधीच्या सर्व भागांचं दिग्दर्शन केलं आहे. श्रद्धाची या चित्रपटात वर्णी लागली नसली तरी या सिनेमात कोणती अभिनेत्री दिसेल, याबाबत चाहते सोशल मीडियावर अंदाज बांधत आहेत.
श्रद्धा सिक्वेलची राणी…
श्रद्धा कपूर याआधी बऱ्याच सिनेमांच्या सिक्वेलमध्ये दिसली आहे. ‘आशिकी २’, ‘एबीसीडी २’, ‘बागी ३’, ‘स्त्री २’ या सिनेमांत श्रद्धा दिसली आहे. जर तिची निवड ‘क्रिश ४’ साठी झाली, तर तिच्या सिक्वेल सिनेमांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं जाईल. तसेच, ‘स्त्री २’ सिनेमा संपताना या सिनेमाचा पुढचा भागही येऊ शकतो, अशी शक्यता दिग्दर्शकाने चित्रपटाच्या शेवटी ठेवली आहे. त्यामुळे आणखी एका सिनेमाचं नाव या यादीत वाढू शकतं.
‘स्त्री २’ हा सिनेमा २०१८ साली आलेल्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचा दुसरा भाग आहे. यात श्रद्धा कपूरसह राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. मॅडॉक निर्मिती संस्थेने या सिनेमाची निर्मिती केली असून, ही संस्था स्वतःचं ‘मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्स’ निर्माण करत आहे. यात अनेक हॉरर कॉमेडी सिनेमे तयार केले जाणार असून, प्रत्येक सिनेमाचा एकमेकांशी संबंध असणार आहे. ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’, ‘रुही’ आणि ‘स्त्री २’ असे सिनेमे आतापर्यंत मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये तयार झाले आहेत.