श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. दिग्गज लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट वादात सापडला आहे, कारण त्यांच्या कुटुंबाने चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला. विठाबाईंचं नाव चित्रपटाच्या शीर्षकातून का वगळलं असा प्रश्न त्यांनी विचारला आणि या नामवंत लोककलावंताला योग्य सन्मान देण्यासाठी नाव बदलण्याची मागणी केली.
वाद टाळण्याचा प्रयत्न
या वादावर ‘ईठा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अनंत जोशीने प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यांनी चित्रपटासाठी विठाबाईंचं मूळ नाव का वापरलं नाही, याचं कारण त्याने सांगितलं. ‘झूम’शी बोलताना तो म्हणाला, “सध्या आपण ज्या काळात जगतोय, ते पाहता मॅडॉक फिल्म्स आणि लक्ष्मण सर स्वतःला कोणत्याही वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा तुम्ही खऱ्या व्यक्तींची आणि त्यांची खरी नावं वापरता, तेव्हा बरेचदा वाद निर्माण होतात. त्यामुळे सुरुवातीला हा वाद टाळणं एवढाच त्यामागचा उद्देश होता.”
पुढे जोशी म्हणाला, “पण या प्रकरणात, जर कुटुंब खरं नाव वापरू देण्यास तयार असेल, तर ते चित्रपटाच्या फायद्याचंच ठरेल. कुटुंब किंवा इतर कोणालाही खरं नाव वापरल्यास आक्षेप नाही, यामुळे चित्रपटाची विश्वासार्हता वाढेल. कारण निर्मात्यांनी ही कथा ज्याची आहे, त्यांना श्रेय दिलंच आहे.”
‘ईठा’ चित्रपटाच्या नावावरून वाद
‘टीव्ही९ मराठी’च्या वृत्तानुसार, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चित्रपटाचं नाव विठाबाईंच्या नावावरून का नाही ठेवलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच विठाबाईंचा वारसा जपणं आणि त्यांचा आदर व्हायला हवा आणि चित्रपटाच्या नावातून लावणी आणि तमाशा क्षेत्रातील त्यांचं अथांग योगदान दिसून यायला हवं, असं त्यांनी म्हटलं.
पाटील यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितलं की, त्यांचा आक्षेप चित्रपटाला नसून फक्त त्याच्या नावाला आहे. “विठाबाई नारायणगावकर या आधीच राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या कलाकार आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या होत्या. ग्रामीण महाराष्ट्रात लोक त्यांना प्रेमाने ‘ईठा’ म्हणायचे. एक मोठं प्रोडक्शन हाऊस, लक्ष्मण उतेकर यांच्यासारखे नावाजलेले दिग्दर्शक आणि श्रद्धा कपूर एकत्र येऊन एवढा मोठा आणत आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातील आणि अगदी जगभरातील लोकही हा चित्रपट पाहतील. त्यामुळे जर त्यांचं मूळ नाव वापरलं तर ते आणखी चांगलं होईल,” असं ते म्हणाले.
तसेच चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवल्यामुळे पुढच्या पिढीचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात कोणाला त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर ते ‘विठाबाई’ ऐवजी ‘ईठा’ नावाने शोधतील. त्यामुळे त्यांचं मूळ नाव बदलू नये. जर मूळ नाव ठेवलं, तर आम्हालाही आनंद होईल आणि त्यांच्या कुटुंबालाही आनंद होईल, असं ते म्हणाले.
विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांची मागणी काय?
चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यापूर्वी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबाकडून कोणतेही हक्क घेतले नाहीत किंवा त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली नाही. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांचे नातू आणि ‘विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाचे’ प्रमुख मोहित नारायणगावकर यांनी सांगितलं की कुटुंबाचा चित्रपटाला कोणताही विरोध नाही. चित्रटाचं स्वागत करतो पण चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ऐवजी ‘विठा नारायणगावकर’ किंवा ‘विठाबाई नारायणगावकर’ असे असावे, अशी विनंती निर्मात्यांना आहे.
दरम्यान या संपूर्ण वादाबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, श्रद्धा कपूर किंवा मॅडॉक फिल्म्स यांपैकी कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
