लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर अभिनीत आगामी ‘ईठा’ चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाला आता नवीन वळण आलं आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रद्धाला तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. मात्र, चरित्रपटाचं नाव ‘विठाबाई’ न ठेवता ‘ईठा’ का ठेवलं, यावरून वाद निर्माण झाला. विठाबाईंच्या कुटुंबीयांमध्ये या नावाबद्दल नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या पण, आता विठाबाईंच्या मुलीने या वादाबद्दल प्रतिक्रिया दिली असून कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आहे.
श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्येष्ठ कन्या मंगला बनसोडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी विठाबाईंचे पुत्र कैलास आणि राजेश नारायणगावकर तसंच नातू मोहित नारायणगावकर यांनी चित्रपटाचं नाव ‘ईठा’ ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगला बनसोडे-करवडीकर यांनी कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली असून त्यांचा ‘ईठा’ या नावावर कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे.
शीर्षक योग्यच आहे – मंगला बनसोडे-रवडीकर
७५ वर्षीय मंगला बनसोडे-करवडीकर या विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्येष्ठ कन्या, ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि राष्ट्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत. त्यांनी सांगितलं की, ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना काहीही आक्षेप नाहीये उलट, गावागावांत तमाशाचे प्रयोग करताना लोक विठाबाईंना प्रेमाने ‘ईठा’ या नावानेच ओळखायचे आणि हाक मारायचे. मंगला बनसोडे-करवडीकर म्हणाल्या, “चित्रपटाच्या ईठा या नावावर आमचा आक्षेप नाही. मी मोहितशी बोलले असून, यापुढे या विषयावर कोणतेही वक्तव्य करू नये, अशी त्याला विनंती केली आहे. हे शीर्षक योग्यच आहे, कारण त्या काळात माझी आई ज्या गावांमध्ये तमाशाचे प्रयोग करायची, तिथले लोक तिला प्रेमाने ईठा म्हणूनच हाक मारायचे”. असं त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाईंच्या कुटुंबीयांना दिलेली भेट
मंगला बनसोडे-करवडीकर यांनी सांगितलं की, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर विठाबाईंच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हाच त्यांनी ‘ईठा’ या नावामागची ही आठवण त्यांना सांगितली होती. त्या म्हणाल्या, “मी सात वर्षांची असल्यापासून रंगमंचावर काम करत आहे. त्या काळापासून लोक माझ्या आईला ईठा या नावाने हाक मारताना मी ऐकत आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना माझ्या आईबद्दल आणि तिने आपल्या कलेसाठी घेतलेल्या अपार कष्टाबद्दल जाणून घेता येईल, याचा आम्हाला आनंद आहे.”
‘ईठा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून, दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरबरोबर रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ईठा हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी, रक्षाबंधनच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
