Eetha Movie Release Date Postponed : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ सिनेमा २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा दमदार टीझर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. ‘ईठा’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. २ मिनिट ३ सेकंदाचा टीझर पाहून नेटकऱ्यांनी श्रद्धाचं भरभरून कौतुक केलं होतं. मात्र, आता हा सिनेमा पाहण्यासाठी श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, ‘ईठा’च्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.
‘ईठा’ सिनेमा महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रद्धा कपूर यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे आणि तिच्यासह रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव असे दमदार कलाकार ‘ईठा’मध्ये झळकणार आहे. नुकतीच ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, आता हा चित्रपट थेट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होईल.
‘ईठा’ सिनेमा आता ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशच्या ‘टॉक्सिक’ सिनेमाबरोबर होणारा क्लॅश टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, ‘ईठा’ टीमने किंवा निर्मात्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ सिनेमा २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर २’मुळे काही महिन्यांपूर्वी ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट सुद्धा बदलण्यात आली होती. अखेर ‘टॉक्सिक’ २६ ऑगस्टला प्रदर्शित होतोय त्यामुळे हा क्लॅश टाळण्यासाठी ‘ईठा’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काही काम बाकी असल्याच्या चर्चा देखील आहेत.
“तुफान येतंय…तुम्ही तयार पाहा कारण, ‘ईठा’ येतेय ४ डिसेंबरला…” असं कॅप्शन देत ‘मॅडडॉक’ने सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे.
दरम्यान, विठाबाईंची कलेवरील निष्ठा वाखाणण्याजोगी होती. एकदा एका प्रयोगादरम्यान, ९ महिन्यांची गरोदर असताना… प्रसूती वेदना होत असतानाही त्यांनी पडद्यामागे जाऊन बाळाला जन्म दिला. त्यानंतर काही मिनिटांतच त्या पुन्हा रंगमंचावर आल्या आणि त्यांनी आपली कला सादर केली. त्यांची ही संघर्षगाथा प्रेक्षकांना ‘ईठा’ सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
